गुजरातच्या मच्छीमार बोटीतील खलाशी बेपत्ता

- रायगड जिल्ह्यात मोरा बंदरात आली होती आश्रयाला
उरण: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोरा बंदरात सुरक्षिततेसाठी थांबलेल्या एका गुजराती मच्छीमार बोटीतील खलाशी बेपत्ता झाला आहे. भरतभाई डालकी (वय ४४) असे या बेपत्ता खलाशाचे नाव आहे.
गुजरात राज्यातील वेरावल येथील भरतभाई कचराभाई डरी यांच्या मालकीची ‘भवानी गंगा’ ही मच्छीमार बोट वादळी हवामानाच्या अंदाजामुळे १९ ऑगस्ट २०२५ रोजी मोरा बंदरात थांबली होती. या बोटीवर ६ खलाशी आणि एक तांडेल असे एकूण सात जण होते.
१९ ऑगस्ट रोजी रात्री शौचालयासाठी गेलेले भरतभाई बराच वेळ परतले नाहीत, म्हणून त्यांचा शोध सुरू झाला. मात्र, ते कुठेही आढळून आले नाहीत. त्यानंतर या घटनेची तक्रार मोरा सागरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आणि सागरी सुरक्षा रक्षक दलाचे जवान बेपत्ता खलाशाचा शोध घेत आहेत. रायगड मत्स्यव्यवसाय विभागाचे सहआयुक्त संजय पाटील यांनी गुजराती बोटीवरील खलाशी आणि तांडेल यांनाही या प्रकरणात पूर्ण सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या घटनेमुळे पुन्हा एकदा समुद्रातील प्रवास आणि व्यवहार किती धोकादायक बनले आहेत, हे दिसून आले आहे.