गुहागर तालुक्यात विसर्जन मिरवणुकीवेळी अपघातात दोघांचा मृत्यू ; पाचजण जखमी
पाचेरी आगर येथील दुर्घटना ; पाच भाविक जखमी
गुहागर : गुहागर तालुक्यात पाचेरी आगर येथे गणपती विसर्जन मिरवणूक सुरू असताना अतिशय दुर्दैवी असा मोठा धक्कादायक अपघात झाला आहे. या दुर्दैवी अपघातात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी तसेच टेम्पो चालकाचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत विसर्जन मिरवणुकीत नाचणारे 5 भाविक जखमी झाले आहेत. कोमल नारायण भुवड वय 17 तर दीपक लक्ष्मण भुवड (वय 48) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. अपघातात मृत्यू झालेले हे दोघेजण व जखमी झालेले गणेशभक्त हे सगळे पाचेरी आगर येथील भुवडवाडी येथे राहणारे आहेत.
गुहागर तालुक्यात पाचेरी आगर येथे अनंत चतुर्दशीनिमित्त गणपती विसर्जन मिरवणूक सुरू होती. यावेळी टेम्पो व दोन गणपती तसेच समोर ड्रायव्हर बरोबर एक 17 वर्षाची मुलगी बसली होती. दुर्दैवाने विसर्जन मिरवणूक सुरू असताना 207 या टेम्पोचे ब्रेक फेल झाले आणि टेम्पो उताराच्या दिशेने पुढे जाऊ लागला. हा प्रकार टेम्पो ड्रायव्हरच्या लक्षात येताच त्यांनी टेम्पो मधून उडी मारून टेम्पो थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी त्या ड्रायव्हरच्या अंगावरून टेम्पो गेला तसेच समोर नाचत असलेल्या भाविकांना या टेम्पोची जोरदार धडक बसली.
या दुर्दैवी घटनेत आत मध्ये बसलेल्या 17 वर्षीय मुलीचाही डोक्याला गंभीर दुखावत झाल्याने जागीच मृत्यू झाला आहे. यामधील जखमी झालेल्या चालक दीपक याला जवळच्या आबलोली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिक उपचार करता त्याला डेरवण येथे नेण्यात येत होते मात्र वाटत असतानाच त्याची प्राणज्योत मालवली.
या अपघाताची माहिती मिळताच गुहागर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस उपविभागीय अधिकारी तसेच अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड याही घटनास्थळी दाखल झाल्या.