गॅसवाहू टँकर उलटल्याने मुंबई-गोवा महामार्गासह रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प

- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीतही बाधा
- गॅस वाहक टँकर उलटण्याची महिनाभरातली दुसरी घटना
हातखंबा : रत्नागिरी कोल्हापूर राष्ट्रीय मार्गावर एल. पी. गॅस वाहू टँकरला हातखंबा येथे अपघात झाल्याने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील वाहतूक वाहतूक काल रात्रीपासूनच ठप्प पडली आहे. अपघातानंतर दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. मात्र तरीही अडकलेल्या वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. दरम्यान, अपघातग्रस्त टँकरमधील वायू दुसऱ्या टँकरमध्ये सुरक्षितपणे घेण्याचे काम सुरू असल्यामुळे घटनास्थळापासून वाहतूक पूर्ववत होण्यास अजून काही तास लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर हातखंबा येथे सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास वायू वाहून नेणारा टँकर उलटला. या घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. अपघातग्रस्त टँकरमध्ये वायू भरलेला असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रत्नागिरी कोल्हापूर तसेच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर हातखंबा येथून होणारी वाहतूक पर्यायी मार्गे वळविण्यात आली आहे. यामुळे घटनास्थळाच्या आधी वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. अपघात झालेले घटनास्थळ हे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच रत्नागिरी कोल्हापूर ( मिऱ्या-नागपुर ) या दोन्ही महामार्गांचा भाग असल्याने वाहतूक समस्येचे तीव्रता वाढली आहे.
महामार्गावरील वाहतूक या पर्यायी मार्गाने वळवली
- पाली येथून बावनदी मार्गे मुंबईकडे
- हातखंब्यातून झरेवाडी मार्गे चांदेराई मार्गे रत्नागिरीकडे
- रत्नागिरीतून देवधेमार्गे लांजातून
गोव्याकडे
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अपघातामुळे कोल्हापूरहून रत्नागिरीकडे होणारी वाहतूक साखरपा- देवरुख -संगमेश्वर हातखंबा अशी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाने वळवण्यात आली आहे.
याचबरोबर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाने हातखंबा येथून होणारी वाहतूक हातखंबा गावातून न होता निवळी घाट- वेसराड ते पाली तसेच उक्षी जाकादेवी रत्नागिरी मार्गे वळवण्यात आली आहे अशी वळवण्यात आली आहे.