गॅस वाहू टँकरला अपघात झाल्याने रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक ४ तासांसाठी बंद
![](https://ratnagirilive.in/wp-content/uploads/2024/06/images-2024-06-20T190218.115.jpeg)
पाली ते दाभोळे फाटा दरम्यानची महामार्ग 166 वरील सर्व वाहनांची वाहतूक ठेवणार बंद
रत्नागिरी, दि. 20 : रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावर दाभोळे घाटात अपघातग्रस्त झालेल्या एलपीजी वाहक टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकर मध्ये काढून घेण्याच्या प्रक्रियेसाठी खबरदारी म्हणून या महामार्गावरील वाहतूक चार तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
देवरुख पोलीस ठाणे हद्दीतील रत्नागिरी ते कोल्हापूर महामार्ग क्रमांक 166 या महामार्गावर 18 जून 2024 रोजी रात्रौ 9 वाजण्याच्या सुमारास दाभोळे घाटात एलपीजी गॅस टँकर नंबर टीएन 88 सी 5873 हा जयगड येथे एलपीजी गॅस भरुन जयगड ते हैद्राबाद असा जात असताना दाभोळे घाटात 45 ते 50 फूट दरीत जाऊन अपघात झालेला आहे. पोलीस विभागाकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली असून, या टँकरमध्ये एलपीजी गॅस भरलेला आहे. संबंधीत एलपीजी कंपनीचे टेक्नीशीयन पथकाने सुध्दा पहाणी केली आहे. त्यानुसार सध्या टँकरमधून गॅस गळती होत नाही. सदरचा टँकर त्या टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरणा करुन दरीतून क्रेनच्या सहाय्याने काढण्यात येणार आहे. हा गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरताना तेथून जाणारे येणारे वाहनांच्या धुरांड्यामधून आगीच्या चिंगारी फुलून आग लागून स्फोट होऊ शकतो. गॅस टँकरमध्ये ज्वलनशील एलपीजी गॅस असल्याने तो सुरक्षितपणे रिक्त करणे आवश्यक आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी टाळणेकरीता व कोणताही अनुचित प्रकार घडु नये या करिता पाली ते दाभोळे फाटा दरम्यानची रत्नागिरी कोल्हापूर महामार्ग 166 वरील सर्व वाहनांची वाहतूक 4 तासांकरीता बंद करण्यात येत आहे.
यादरम्यान पर्यायी मार्ग म्हणून पाली ते लांजा ते कोर्ले तिठा मार्गे दाभोळे फाटा या पर्यायी मार्गाने वाहतुक वळविणेत येत आहे, असे अपर जिल्हा दंडाधिकारी रत्नागिरी यांनी आदेशित केले आहे.