जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून अपशब्द वापरणाऱ्या काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांचा उरणमध्ये निषेध

- स्व स्वरूप संप्रदाय तालुका उरण जिल्हा सेवा समिती उत्तर रायगडतर्फे निषेध
उरण (विठ्ठल ममताबादे ) : विधानसभा निवडणुकीत २०२४ मध्ये संघ आणि संघ प्रणित साधू संत यांनी हिंदुत्व वाचविण्यासाठी जनजागरण केले.साधू संत पाठीशी असल्यामुळे महायुतीचा विजय झाला. नरेंद्र महाराज यांचेही सहकार्य लाभले, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रम दरम्यान मत व्यक्त केले. या व्यक्तव्यामुळे आता महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेसचे नेते, काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराजांचा एकेरी उल्लेख करत त्यांना अपशब्द बोलत त्यांचा अपमान केला.त्यामुळे संतप्त झालेल्या श्री स्वामी नंरेद्राचार्यांचे शिष्य गणांनी, भक्त गणांनी संपूर्ण महाराष्ट्रात विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात निषेध आंदोलन केले. उरण मध्ये रात्री ८ वाजता उरण शहरातील पेन्शनर्स पार्क येथे स्व स्वरूप संप्रदाय तालुका उरण जिल्हा सेवा समिती उत्तर रायगड यांच्या माध्यमातून विजय वडेट्टीवार यांचा जाहिर निषेध करण्यात आला.

यावेळी ३५० हुन अधिक भाविक भक्त, शिष्यगण यावेळी उपस्थित होते. माफी मांगो, माफी मांगो विजय वडेट्टीवार माफी मांगो, हिंदू धर्माचा विजय असो, साधू संताचा अपमान करणाऱ्यांचा जाहीर निषेध, जगद्गुरूंचा अपमान करणाऱ्यांचा जाहीर निषेध अशा शब्दात घोषणा देत विजय वडेट्टीवारांच्या प्रतिमेला जोडे मारत घोषणाबाजी करत यावेळी निषेध करण्यात आला.

यावेळी भाविक भक्त, शिष्यगण आक्रमक झालेले दिसून आले. विजय वडेट्टीवारांनी आपल्या वक्तव्या विषयी जगदगुरु नरेंद्रचार्यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी भाविक भक्त, शिष्य गणांनी केली आहे.