महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यांच्या नेतृत्वाखाली ‘जीवनदान महाकुंभ’

नऊ राज्यांत १४६० महारक्तदान शिबिरे

नाणीज, दि. ३ जानेवारी : जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य रामानंदाचार्य दक्षिण पीठ, नाणीजधाम यांच्या आध्यात्मिक प्रेरणेने व नेतृत्वाखाली महाराष्ट्रासह देशातील नऊ राज्यांत मानवतेच्या सेवेस समर्पित अशा ‘जीवनदान महाकुंभ’ महारक्तदान शिबिरांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

दि. ४ ते १८ जानेवारी २०२६ या कालावधीत सलग १५ दिवसांत १४६० ठिकाणी महारक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येणार असून, या माध्यमातून लाखो रक्तकुपिका संकलित करण्याचा संकल्प रामानंदाचार्य दक्षिण पीठाने केला आहे. या महायज्ञात महाराष्ट्र, गोवा, गुजरात, छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, राजस्थान, दादरा-नगर हवेली व दमण-दीव या राज्यांचा समावेश आहे.
जानेवारी ते मार्च या कालावधीत देशभरात रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण होतो. ही सामाजिक गरज ओळखून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेतून हा महारक्तदान संकल्प साकार करण्यात आला आहे.
“अधिकाधिक नागरिकांनी रक्तदान करून राष्ट्रसेवेत सहभागी व्हावे,” असे आवाहन जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांनी केले आहे.
या महारक्तदान शिबिरांत संकलित होणारे रक्त राज्य रक्त संक्रमण सेवाअंतर्गत शासकीय व अधिकृत रक्तपेढ्यांमार्फत वितरित करण्यात येणार आहे. या रक्तदानाचा थेट लाभ समाजातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना होणार असून,
मायक्रोसाइटिक ॲनिमिया, सिकलसेल, थॅलेसिमिया, हिमोफिलिया, ब्लड कॅन्सर, किडनी फेल्युअर यांसारख्या गंभीर आजारांशी झुंज देणाऱ्या हजारो रुग्णांचे प्राण वाचविण्यास हे रक्तदान उपयुक्त ठरणार आहे. शासकीय रुग्णालयांतील रुग्णांनाही याचा मोठा लाभ होणार आहे.

रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधामच्या इतिहासात रक्तदान ही केवळ सामाजिक कृती नसून, विशिष्टाद्वैत  सिद्धांतावर आधारलेली सजीव उपासना आहे. “ईश्वर सर्वत्र आहे, प्रत्येक जीवात आहे; त्यामुळे जीवाची सेवा हीच ईश्वरसेवा” — या तत्त्वज्ञानातूनच रक्तदान, अन्नदान, शिक्षणदान, आरोग्यसेवा, पर्यावरण संवर्धन यांसारखे उपक्रम अखंडपणे राबवले जात आहेत.
मागील पंचवीस वर्षांहून अधिक काळापासून या परंपरेचे सातत्य दिसून येते.
२००३ साली नाशिक कुंभमेळ्यात अवघ्या १० तासांत ६४९० रक्तकुपिकांचे संकलन
२०१६ मध्ये जगद्गुरुंच्या वाढदिवसानिमित्त ७०० कॅम्पमध्ये ६५,४८७ रक्तकुपिका
२०१७ मध्ये २५,५८३,
२०१८ मध्ये ५०,०००,
२०१९ मध्ये ६०,८९८, तर २०२४ मध्ये तब्बल ८१,१०७ रक्तकुपिका संकलित झाल्या आहेत.
२०२५ मध्ये केवळ १५ दिवसांत १,३६,२७२ रक्तकुपिकांचे ऐतिहासिक संकलन करण्यात आले होते.

“रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. परमेश्वराने दिलेला अमूल्य ठेवा मानवतेच्या रक्षणासाठी अर्पण करणे हीच खरी भक्ती आहे,” असा संदेश देत रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधामने समाजासमोर सेवा, श्रद्धा व अध्यात्म यांचे एकात्म दर्शन घडवले आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button