जयगडमधील वायगळती बाधा झालेल्या १७ विद्यार्थी पुन्हा रुग्णालयात दाखल
रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथील जिंदल कंपनीच्या जे एस डब्ल्यू पोर्टवर वायू गळती होऊन झालेल्या दुर्घटनेची बाधा झालेल्या विद्यार्थ्यांना घरी सोडल्यानंतर पुन्हा त्रास झाल्याने सोमवारी पुन्हा एकदा रुग्णाला दाखल करावे लागले आहे. पुन्हा रुग्णालयात दाखल केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १७ इतकी आहे.
जयगड येथील जे एस डब्ल्यू पोर्ट परिसरात वायू गळती झाल्याने त्या परिसरातील नांदिवडे येथील विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या जवळपास ६० विद्यार्थ्यांना वायूगळतीनंतर श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात देखील दाखल करावे लागले होते. यातील बहुतांश विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना घरी देखील पाठवण्यात आले होते.
दरम्यान, सोमवारी वायूबाधित आणि उपचारानंतर घरी सोडलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा त्रास जाणवू लागल्याने यातील सतरा विद्यार्थ्यांना उपचाराकरिता पुन्हा रुग्णालयात दाखल करावे लागले.