महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयराष्ट्रीयलोकल न्यूज

मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाचा मिरजोळे समुह ग्रामपंचायतीमधून शुभारंभ

  • प्रत्येक तालुक्यातील एक गाव मॉडेल म्हणून तयार करु – पालकमंत्री डॉ. उदय सामंत


रत्नागिरी  : ज्या गावामध्ये आज मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाचा शुभारंभ होतोय, त्यांनी स्पर्धेतील पारितोषिक टार्गेट म्हणून काम करायला आजपासून सुरू करावं. आपली ग्रामपंचायत ही चांगल्या पद्धतीची असली पाहिजे, त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावा. प्रत्येक तालुक्यातील एका गावावर आपण लक्ष केंद्रीत करु. प्रत्येक तालुक्यातील एक गाव मॉडेल गाव म्हणून तयार करु. त्याच्यामागे पूर्ण ताकद उभी करु. ही नऊच्या नऊ गावं महाराष्ट्राला आदर्शवत ठरतील. या गावांना आदर्श मॉडेल बनवण्यासाठी जे जे काही निधीची आवश्यकता लागेल, ती देण्याची जबाबदारी माझी, अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही, असे आश्वासन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.


मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाचा शुभारंभ मिरजोळे समुह ग्रामपंचायतीमधील बाळासाहेब ठाकरे सभागृहात पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते आज झाला. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, गटविकास अधिकारी चेतन शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, मिरजोळेचे सरपंच रत्नदीप पाटील, बाळ सत्याधारी महाराज, उपसरपंच अशोक विचारे, ग्रामपंचायत अधिकारी मधुकर कांबळे, माजी सरपंच गजानन गुरव, ग्रामपंचायत सदस्य राहुल पवार, ग्रामपंचायत सदस्य श्वेताली पाटील आदी उपस्थित होते.


पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, आपल्या वागण्याचा सुगंध आपण चांगल्या पद्धतीने जर गावांमध्ये पसरवला तर आपण 30 दिवसांमध्ये विकासात्मक सुगंध देखील पसरवू शकतो हे महाराष्ट्राला दाखवू. मिरजोळे ग्रामपंचायत ही नवी रत्नागिरी आहे. तुमच्या बाजूला सहा महिन्यानंतर विमानतळ सुरु झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटक येणार आहेत. त्याच्यामुळे माझी ग्रामपंचायत जी नवी रत्नागिरी म्हणून विकसित होते ही रत्नागिरी शहरापेक्षा देखील चांगल्या पद्धतीची असली पाहिजे. एवढीच तयारी आजपासून आपण करूया. ज्या गावात या अभियानाचा शुभारंभ होत आहे त्या गावाला या अभियानात बक्षिस मिळालेच पाहिजे, असा संकल्प आपण आज करु या.
त्रिस्तरीय पंचायत राज योजनेला सुरुवात झाली. 1992 सालामध्ये 73 वी घटनादुरुस्ती झाली त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला स्वायत्तता अधिकार प्राप्त झाले. 1992 सालानंतर गावाचा सरपंच हा गावाचा मुख्यमंत्री झाला. त्यामुळे या अभियानामध्ये आपण अग्रेसर कसे राहू ही त्यांच्यावर आणि त्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांची जबाबदारी आहे. रत्नागिरी शहरासह शहरालगतच्या 5 गावांच्या घनकचरा प्रकल्पाला 5 एकर जमिनही एमआयडीसीने याआधीच दिलेली आहे. त्याचा डीपीआर सुरु आहे. 25 कोटी रुपये खर्च करुन हा प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आपल्या गावातील कचऱ्याची विल्हेवाट आपल्या गावातच लावली पाहिजे, अशी संकल्पना या अभियानामध्ये आहे.


आपलं घर आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची सुरुवात आपण आपल्यापासून करु या. महिला भगिनींना त्यांच्या स्वत:च्या पायावर उभे राहता येईल, यासाठी त्यांना प्रशिक्षीत केले पाहिजे. प्रत्येक महिला भगिणींना स्वत:च्या कमाईमधून 10 हजार महिना कमवले पाहिजेत, यासाठी आम्ही लखपती दिदी महाराष्ट्रात राबवतोय. 25 लाख झाल्या आहेत आणि तो आकडा एक कोटी पर्यंत आपल्याला न्यायचा आहे. त्याच्यामधल्या पाच हजार महिला रत्नागिरीमधील का असू नयेत. महिला भगिणींना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती, क्लस्टर, खादी ग्रामोद्योगमधून मधाचा उद्योग करा. विश्वकर्मा योजनेमधील रोजगार करा. काही महिलांनी स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी गट तयार करा. महिला भगिनींना आठ ठिकाणी सबसिडी देऊन स्वतःच्या पायावर उभं करण्याचे विभाग जे आहेत, ते माझ्याकडे आहेत. अभियान आपल्याला पुढे नेण्यासाठी आणि पंचायत राजचा पाया मजबूत करण्यासाठी आणि गावं स्वायत्त करवायाची असतील तर आपल्याला कटू निर्णय घ्यावे लागतील, असेही ते म्हणाले.


प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थ्यांना शिधापत्रिका, उत्पन्नाचे दाखले याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास, तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. दिपप्रज्व््लनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रानडे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button