जलशक्ती अभियानांतर्गत रत्नागिरीतील सर्व विभागांचे काम चांगले : अणुऊर्जा संचालक आरती सिंग परिहार
रत्नागिरी, दि. २ : जलशक्ती अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व विभागाने चांगले काम केले आहे, असे गौरवोद्गार भारत सकारच्या अणुऊर्जा संचालक आरती सिंग परिहार यांनी काढले.
केंद्रशासन पुरस्कृत जलशक्ती अभियान सन 2022-23 कार्यक्रमांतर्गत श्रीमती परिहार या दोन दिवस जिल्हा दौऱ्यावर आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तांत्रिक सहकारी डाॕ के एम नायक यांचेही स्वागत मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पुष्पगुच्छ देवून केले.
जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी यावेळी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. जिल्ह्याची लोकसंख्या, भौगोलिक परिस्थिती, पर्जन्यमान, वृक्षलागवड, सिंचन विहिरी, करण्यात आलेली कामे याचा यात समावेश होता. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार यांनी या अभियानांतर्गत करण्यात आलेल्या जनजागृती कार्यक्रमांबाबत माहिती दिली.
श्रीमती परिहार म्हणाल्या, आपण केलेल्या स्वागतांनी मला माझ्या जिल्ह्यासारखे वाटले. या अभियानांतर्गत सर्व विभागांनी चांगले काम केले आहे. क्रमाक्रमाने अजूनही यामध्ये कसं सुधारणा करता येईल, याबाबतही विचार करावा. वर्षावर्षाला यात प्रगती व्हावी, असेही त्या म्हणाल्या. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे यांनीही यावेळी कृषीविषयक माहिती दिली. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी आभार प्रदर्शन केले.