Mumbai-Goa Highway | आरवली येथील सर्व्हिस रोडचे उर्वरित काम सुरु

ग्रामस्थांच्या प्रजासत्ताक दिनी आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल
आरवली : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामांतर्गत संगमेश्वर तालुक्यातील आरवली बाजारपेठेतील रखडलेले सर्विस रोडच्या डांबरीकरणासह पूर्ततेचे काम तसेच गटार बांधणी अखेर ठेकेदार कंपनीकडून सुरू करण्यात आली आहे. यासाठी प्रजासत्ताक दिनी ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. तहसीलदारांनी या बाबत बैठक घेऊन ठेकेदाराला सूचना दिल्यानंतर हे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे.
आरवली बाजारपेठेतील उड्डाण पुलाच्या बाजूने दोन्ही बाजूंनी जाणाऱ्या सर्विस रोडचे हे काम रखडल्याने ग्रामस्थांना धूळ मातीचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यांच्या गटाराचे कामही झालेली नाही. या कामाकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थ दिनेश परकर यांनी इतर ग्रामस्थांना सोबत घेऊन प्रजासत्ताक दिनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

या पार्श्वभूमीवर संगमेश्वरच्या तहसीलदार अमृता साबळे यांनी ठेकेदार जे. एम. म्हात्रे कंपनीचे प्रतिनिधी बांधकाम खात्याचे अधिकारी तसेच उपोषणकर्ते ग्रामस्थ यांची एक संयुक्त बैठक प्रजासत्ताक दिनापूर्वी घेतली. त्यामध्ये गटाराचे काम तातडीने सुरू करण्याचे आश्वासन ठेकेदार कंपनीने दिले. बैठकीच्याच दिवशी हे काम सुरू करण्यात आले आहे. मार्च अखेरपर्यंत आरवली बाजारपेठेतील सर्विस रोडचे डांबरीकरण तसेच गटाराचे काम देखील पूर्ण केले जाणार आहे. सध्या रस्त्याच्या बाजूंनी जाणारे गटार खोदण्याचे काम कंपनीने सुरू केले आहे. ते पूर्ण झाल्यावर दोन्ही बाजूंच्या सर्व्हिस रोडचे डांबरीकरण केले जाणार आहे.