जि. प., पं. स. मतदानाच्या दिवशीच शिक्षकांची सीटीईटी परीक्षा

- वेळापत्रकात बदल करण्याची रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
रत्नागिरी : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) ही 7 व 8 फेब्रुवारी रोजी होणार आहे. मात्र 7 रोजी आता जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यातील हजारो शिक्षकांना या परीक्षेपासून मुकावे लागणार आहे.
सध्या राज्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. वेळापत्रकानुसार सदर निवडणुका दि. 5 फेब्रुवारी 2026 रोजी संपन्न होणार होत्या. परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता. यामुळे राज्य निवडणूक आयोग यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कार्यक्रमांमध्ये बदल केला असून सदर निवडणुका बदललेल्या नियोजनानुसार दि. 7 फेब्रुवारी 2026 रोजी संपन्न होणार आहेत. मात्र याच दिवशी केंद्रीय स्तरावरील शिक्षक पात्रता परीक्षा पूर्वनियोजित आहे.
महाराष्ट्र शासनाने नुकतेच राज्यातील इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण असणे बंधनकारक केले आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय टीईटी परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार 7 व 8 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहेत. या परीक्षेला राज्यातील हजारो शिक्षक प्रविष्ठ होत आहेत. या परीक्षेची केंद्र ही महानगरामध्ये नियोजित आहेत. त्यामुळे परीक्षेच्या नियोजित दिनांकापूर्वी एकदिवस संबंधित शिक्षकांना परीक्षा केंद्राच्या ठिकाणी उपस्थित रहाणे आवश्यक आहे. बदललेल्या नियोजनानुसार याच दिवशी राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका असल्याने व निवडणूक क्षेत्रातील जवळपास सर्व शिक्षक निवडणूक कर्तव्यावर असल्याने राज्यातील हजारो शिक्षकांना या परीक्षेला मुकावे लागणार आहे.
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाने याबाबत एक निवेदन जिल्हाधिकारी व शिक्षण संचालकांना दिले आहे. केंद्रीय टीईटी परीक्षा यंत्रणेशी संपर्क साधून या परीक्षा वेळापत्रकामध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती केली आहे.





