ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांसाठी टपाली मतपत्रिकेचे वाटप वेळेत करा : जिल्हाधिकारी
डमी ब्रेललिपी मतपत्रिकाही देणार : जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह
रत्नागिरी, दि. 27 : दिव्यांग व 85 वर्षांपुढील ज्येष्ठांसाठी घरातून मतदान करण्यासाठी टपाली मतपत्रिकेचे वाटप वेळेत पूर्ण करा, अशी सूचना करतानाच, हे मतदान ऐच्छिक आहे. 1370 दृष्टीहीन ब्रेल साक्षर मतदारांसाठी डमी ब्रेल लिपी मतपत्रिका दिल्या जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली.
85 वर्षां वरील मतदार आणि दिव्यांग मतदारांसाठीच्या सुविधांबाबत जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी आज आढावा बैठक घेतली. बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, प्रांताधिकारी जीवन देसाई, दिव्यांगांसाठी सामाजिक काम करणाऱ्या संस्थेच्या प्रतिनिधी आदी उपस्थित होते. क्षेत्रीयस्तरावरील प्रांताधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, टपाली मतदानासाठी 12 ड अर्जाचे वाटप वेळेत पूर्ण करावे. ज्या मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी रॅम्पची सुविधा नाही, तेथे नव्याने ती करावी. ज्या ठिकाणी दुरुस्ती आवश्यक आहे, तेथे दुरुस्ती करुन घ्यावी. पाणी, स्वच्छागृहे याची देखील सुविधा ठेवावी. व्हीलचेअरची किती उपलब्ध आहेत, मागणी किती आहे. या बाबतचा आढावा घेवून, त्या बाबतची सद्यस्थिती कळवावी.
घरापासून मतदान केंद्रांवर येण्यासाठी दिव्यांगाच्या मदतीसाठी एन. एस. एस आणि एन. सी. सी कॅडेटसना सोबत ठेवावे. तसेच त्यांना प्रशासनामार्फत घरापासून मतदान केंद्रांपर्यंत पिकअप सुविधा द्यावी. अधिका-धिक मतदान होण्याच्या दृष्टीने मतदार जन जागृतीपर कार्यक्रम घ्यावेत, असे ही ते म्हणाले.
उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्री.गायकवाड यांनीही यावेळी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सविस्तर माहिती दिली.