झाडे लावणे ही आजची महत्त्वाची गरज : दत्ता कदम
लांजा : मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड आणि त्या तुलनेत नव्याने झाडे लावण्याचे कमी झालेले प्रमाण यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. ती भरून काढण्यासाठी झाडे लावणे ही उद्याची नव्हे तर आजची अत्यंत महत्त्वाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सभापती दत्ता कदम यांनी केले.
मुंबईतील राजापूर-लांजा तालुका नागरिक संघातर्फे हे माझे झाड या संकल्पनेवर आधारित वृक्षमहोत्सव आज व्हेळ (ता. लांजा) येथील रुक्मिणी भास्कर विद्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी श्री. कदम बोलत होते. राजापूर तालुक्यातील वाटूळ ते संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे रस्त्यावर व्हेळ-विलवडे या भागात रस्त्याच्या दुतर्फा स्थानिक वृक्षांच्या पाचशे रोपांची लागवड आज करण्यात आली. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मोठे योगदान असलेल्या इंडियन ऑइल कंपनीने प्रायोजित केलेला हा वृक्षमहोत्सव मोठ्या थाटात साजरा झाला. ‘हे माझे झाड’ उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाची नवी दिशा या वृक्षमहोत्सवामुळे मिळेल, असे मत इंडियन ऑइल कंपनीतर्फे यावेळी व्यक्त करण्यात आले. पाचशे विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एका झाडाचे रोप लावले. या झाडांचे संगोपनही विद्यार्थ्यांनी करावे, आसाठी प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावाने एक ट्रीगार्ड बसवण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि निसर्ग यांच्यातील अनुबंध अधिक दृढ होईल. विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धनाच्या दिशेने प्रोत्साहित करणे हा उपक्रमाचा उद्देश आहे. वृक्षमहोत्सवामुळे तो सफल होईल. या उपक्रमासाठी कोकणातील वड, चिंच, पिंपळ, करंज, ताम्हण, काजरा यांसारख्या झाडांची निवड करण्यात आली आहे. ही झाडे केवळ सावली देणारी नसून पशुपक्ष्यांना निवारादेखील देतील. त्यामुळे या वृक्षारोपण उपक्रमाला पर्यावरणाच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. म्हणूनच इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने दिले आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन भारतातील कोट्यवधी नागरिकांच्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्याबरोबरच विविध पर्यावरणीय उपक्रमांचेदेखील प्रायोजन करते. व्हेळ येथील वृक्षमहोत्सव हाही त्याचाच एक भाग आहे. या उपक्रमामुळे पर्यावरणाच्या संरक्षणाला हातभार लागेल आणि भविष्यातील पिढ्यांना एक शुद्ध आणि सशक्त पर्यावरण उपलब्ध होईल, अशी अपेक्षाही इंडियन ऑइल कॉर्पोरेशनतर्फे व्यक्त करण्यात आली.
राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे सरचिटणीस प्रमोद पवार अध्यक्ष सुभाष लाड यांनी वृक्षमहोत्सवाचा उद्देश स्पष्ट केला. सुरुवातीला व्हेळच्या विद्यार्थ्यांनी वृक्षगान सादर केले. उद्घाटन समारंभापूर्वी पालखीतून वडाच्या झाडाची दिंडी काढण्यात आली. व्हेळ परिसरातील व्हेळ आणि विलवडे प्राथमिक शाळांमधील मुले, व्हेळ हायस्कूल, लांज्यातील न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाचे विद्यार्थी, कल्पना कॉलेजच्या विद्यार्थिनी, सामाजिक वनीकरण विभागाचे कर्मचारी या सर्वांनी एकाच वेळी ५०० रोपांची लागवड केली.
वृक्षमहोत्सवात व्हेळ, विलवडे, वाघणगाव, वाटूळ ग्रामपंचायती, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विलवडे रेल्वे प्रवासी संघटना, विलवडे रेल्वे स्टेशन रिक्षा संघटना, अपना बाजार, तांबे उपाहारगृह, लांजा डॉक्टर्स असोसिएशन, ज्येष्ठ नागरिक संघटना या संस्थांनी वृक्षमहोत्सवाला सक्रिय सहकार्य केले.