ठाण्यातील प्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञ डॉ. आशिष सरवटे यांचे रत्नागिरीत व्याख्यान

रत्नागिरी : मधुमेह अर्थात डायबेटीस या विकाराचे प्रमाण जगभरात वाढत चालले आहे. भारतात तर या विकाराची तीव्रता इतकी वाढत आहे, की भारताला मधुमेहाची राजधानी हा नकोसा किताब मिळाला आहे. जागतिक मधुमेह दिन १४ नोव्हेंबर रोजी पाळला जातो. त्याचे औचित्य साधून १६ नोव्हेंबर २०२५ रोजी रत्नागिरीत विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. ठाण्यातील प्रथितयश मधुमेहतज्ज्ञ ( डायबेटॉलॉजिस्ट) डॉ. आशिष सरवटे हे व्याख्यान देणार असून, ‘मधुमेहींनी घ्यायची पायांची काळजी’ असा व्याख्यानाचा विषय आहे.
दीर्घ काळ डायबेटीस असलेल्या व्यक्तींच्या पायांना जखमा होतात आणि त्या लवकर बऱ्या होत नाहीत. योग्य वेळी योग्य उपचार झाले नाहीत, तर ही समस्या गंभीर रूप धारण करू शकते. म्हणूनच या समस्येविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी, १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता स्वयंवर मंगल कार्यालयात (बोर्डिंग रोड) हे व्याख्यान होणार असून, त्यासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे. व्याख्यानानंतर चहापान आणि अल्पोपाहाराची व्यवस्थाही करण्यात आली आहे. अधिकाधिक जणांनी या व्याख्यानाला उपस्थित राहून या विषयाची माहिती करून घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
व्याख्यानाला कोणी यावे?
ज्यांना मधुमेह आहे, ज्यांना १० वर्षांपेक्षा अधिक काळ मधुमेह आहे आणि तो अनियंत्रित आहे, अशा व्यक्तींनी या व्याख्यानाला आवर्जून यावे. त्याशिवाय, ज्यांच्या कुटुंबात बऱ्याच जणांना मधुमेह आहे अशा व्यक्तींनी, तसेच ज्यांच्या घरात कोणाला तरी मधुमेहामुळे गँगरीन झाले असेल त्यांनीही या व्याख्यानाला यावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.





