तरुणांनी ग्राहक चळवळ खेडोपाडी पोहोचवावी
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक यांचे आवाहन
गुहागर : तरुणांनी आणि विद्यार्थ्यांनी ग्राहक चळवळ अधिकाधिक पद्धतीने गावोगावी पोहोचवावी. जेणेकरून समाज जागृत होईल व त्याची होणारी फसवणूक थांबेल, असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक यांनी केले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या कोकण प्रांतचा सुवर्ण जयंती वर्ष उद्घाटन सोहळा चिपळूण येथे चितळे मंगल कार्यालयामध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी राष्ट्रीय कार्यकारिणी सह सचिव सौ. नेहाताई जोशी, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य विजय भागवत, कोकण प्रांत अध्यक्ष चंद्रकांत झगडे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, चिपळूण तालुका उपाध्यक्ष श्री. कुलकर्णी आदी उपस्थित होते.
कोकण प्रांत अध्यक्ष चंद्रकांत श्री. झगडे यांनी प्रास्ताविकेमध्ये ग्राहक चळवळ व आपली भूमिका यावर मार्गदर्शन केले. तहसील कार्यालय चिपळूण यांच्या मार्गदर्शनाखाली जागो ग्राहक जागो पंधरवड्यानिमित्त घेण्यात आलेल्या बहि:शाल व्याख्यान मालेतील न्यू इंग्लिश स्कूल खडपोली, श्री दत्त विद्यालय दळवटणे मोरवणे वालोटी, श्रीराम वरदायिनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय निरबाडे या शाळेतील विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व पुस्तक देण्यात आले.
श्री. पाठक पुढे म्हणाले की, भारताच्या वैभवशाली समाज निर्मितीसाठी प्रत्येकाने ग्राहक आंदोलनात सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रीय कार्यकारिणी सहसचिव सौ. नेहाताई जोशी यांनी सुवर्ण जयंती वर्षानिमित्त ग्राहकांच्या हितासाठी जास्त कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. कवी व विविध विषयांवर व्याख्यान देणारे मंदार ओक यांनी ग्राहकांची गरज हीच मानसिकता असते. ग्राहकांचे हित कशामध्ये असतं याची अतिशय खुमासदार पद्धतीने विविध उदाहरणांच्या मार्फत पटवून दिले.
संघटनेच्या कार्यामध्ये योगदान देणारे पूर्व दायित्व कार्यकर्ते श्री. अण्णा पटवर्धन, समीर जानवळकर, विनायक निमकर, सिताराम शिंदे आदींचा गौरव करण्यात आला. यावेळी श्री. शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. चितळे मंगल कार्यालयाचे मोहन चितळे यांनी उदघाटन सोहळ्याला सर्वोतोपरी सहकार्य केल्याबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला जिल्हा सचिव निलेश गोयथळे, गुहागर तालुकाध्यक्ष श्री. गणेश धनावडे, संगमेश्वर तालुकाध्यक्ष श्री. दीपक पोंक्षे, गुहागर तालुका सचिव प्रदीप पवार, खजिनदार सुशील अवेरे, सदस्य प्रवीण कनगुटकर, समीर जांगळी, अनंत धनावडे, श्री. चव्हाण, संतोष घुमे आदींसह जिल्ह्यातील संघटनेचे बहुसंख्य सभासद उपस्थित होते. चिपळूण तालुका सचिव प्रकाश सावर्डेकर यांनी सूत्रसंचालन केले. तर आनंद ओक आणि संघटन मंत्र, ग्राहक गीत व कल्याण मंत्र अतिशय उत्तमपणे सादर केले.