तळवडे येथील जगन्नाथ पेडणेकर विद्यालयात वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम
लांजा : कोकण मराठी साहित्य परिषद शाखा लांजा व ज. गं. पेडणेकर माध्यमिक विद्यालय, तळवडे यांच्या संयुक्त विद्यमाने पेडणेकर विद्यालय तळवडे येथे डॉ. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सादर केलेल्या कथा, कविता, श्लोक, अभिवाचन, भारुड व पोवाडा आदी सादरीकरणातून विद्यार्थ्यानी उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाला व्यासपीठावर कोमसाप शाखा लांजाचे अध्यक्ष रामचंद्र जाधव, प्रशालेच्या स्थानिक संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटोळे, कोमसाप लांजाच्या उपाध्यक्षा डॉ. माया तिरमारे, कोषाध्यक्ष शहाजीराव देशमुख, सदस्य, साहित्यिक प्रभाकर गवाणकर, मुख्याध्यापक डी. बी. पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते. प्रथम डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक डी. बी. पाटील यांनी केले. प्रशालेतील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी श्लोक म्हटले. दिक्षा मांडवकर हीने आई कविता तर मुक्ता खामकर हीने कथा सादर केली. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी भारुड तर तेजस सावंत व लतिका सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर केला. कोमसाप शाखा लांजाच्यावतीने प्रशालेतील 189 विद्यार्थ्यांना यशाचा राजमार्ग – आत्मविश्वास हे पुस्तक भेट म्हणून देण्यात आले. वाचनाचे जीवनातील स्थान याबाबत प्रभाकर गवाणकर, डॉ. माया तिरमारे, शहाजीराव देशमुख यांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा पाटोळे, स्वरा वासुरकर यांनी केले. कार्यक्रमाला स्थानिक संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटोळे, प्रकाश हर्चेकर, श्वेता सावंत, विवेक किल्लेदार, मधुरा तिरमारे, अविनाश चव्हाण, जनार्दन पाटोळे, आदी उपस्थित होते. आभार विवेक किल्लेदार यांनी मानले.