तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या सुनेने सासऱ्याच्या जेवणात कालवले विष!

- पतीलाही झाली मिसळणाऱ्या सुनेस अटक
देवरुख : अवघ्या तीन महिन्यापूर्वी लग्न झालेल्या सुनेने सासरे तिला घरातील काम करण्यास सांगतात या रागातून जेवणात विष कालवल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर सासऱ्यांसह पतीलही विषबाधा झाली आहे. या प्रकरणी संशयित सुनेला पोलिसांनी अटक केली आहे. संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहरा नजीकच्या कुसुंब रेवाळेवाडी येथे ही घटना घडल्याचे समोर आले आहे.
यात सासऱ्याबरोबरच पतीलादेखील विषबाधा झाली असून रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सुनेवर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आले आहे. देवरुख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन जगन्नाथ सोलकर (३४) यांनी फिर्याद दिली आहे. स्वप्नाली सचिन सोलकर (३२) असे संशयित आरोपी महिलेचे नाव आहे. सचिन सोलकर व स्वप्नाली सोलकर यांचा १३ एप्रिल २०२५ रोजी विवाह झाला. स्वप्नाली हिला सासरे जगन्नाथ सोलकर हे घरातील कचरा काढणे, साफसफाई करणे व इतर कामे चांगल्या प्रकारे करण्यास सांगायचे. याचा राग स्वप्नाली हिने मनात धरून जगन्नाथ सोलकर यांना जीवे ठार मारण्यासाठी चक्क जेवणामध्ये विषारी द्रव मिसळल्याचे सचिन सोलकर याने फिर्यादीत नमूद केले आहे. विष मिसळलेले जेवण खाल्ल्याने सचिन यालादेखील विषबाधा झाली. ही घटना मंगळवारी २२ जुलै रोजी रात्री ९.३० वाजता घडली. जगन्नाथ सोलकर व सचिन सोलकर यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना प्रथम देवरुख ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.