दापोलीतील खेम धरणात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह ‘एनडीआरएफ’च्या हाती
दापोली : रविवारी इतर मित्रांसह दापोली तालुक्यातील हर्णे खेम धरणावर पोहायला गेला असता बुडून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह शोधून काढण्यात अखेर तिसऱ्या दिवशी राष्ट्रीय आपत्ती व बचाव पथकाच्या जवानांना यश आले आहे. कल्पेश बटावळे असे या 19 वर्षीय तरुणाचे नाव आहे.
इतर मित्रांसह कल्पेश बटावळे (19) हा पोहायला गेला असता दापोलीतील खेम धरणाच्या जलाशयात बुडाला होता. त्याच्या इतर तीन मित्रांना वाचवण्यात स्थानिक ग्रामस्थांना यश आले होते. दिनांक ७ जुलै रोजी दुर्घटना घडली होती. स्थानिक पोलीस, ग्रामस्थ तसेच अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आधीच तैनात असलेल्या एनडीआरएफच्या पथकाकडून बुडालेल्या कल्पेश याचा शोध सुरू होता. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास खेम धरणाच्या भिंतीलगत त्याचा मृतदेह तरंगताना आढळला. त्याला पाण्याबाहेर काढून दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तो असल्याचे सांगितले.
लांजा तालुक्यातील खोरनिनको येथील धरणाच्या धबधब्याखाली काही दिवसांपूर्वीच एका तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील धरणे, धबधबे तसेच इतर जलाशयांवर पर्यटनासाठी जाणाऱ्याकरिता मनाई आदेश जाहीर केले आहेत. मात्र तरीही हौशी पर्यटक अती उत्साहात वर्षा पर्यटनासाठी जाताना दिसत आहेत.