दापोलीसाठी ‘सुवर्णदुर्ग रोप वे’ला शासनाचा हिरवा कंदील!

- मिहीर महाजन यांनी मानले महाराष्ट्र शासन व केंद्रशासनाचे आभार
मुंबई : दापोलीच्या पर्यटन क्षेत्रात मनाचा तुरा रोवणारा सुवर्णदुर्ग रोपवे व्हावा हे दापोलीतील पर्यटन प्रेमींचे आणि अभ्यासकांचे स्वप्न आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. दापोलीतील बांधकाम व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते, मिहीर महाजन यांनी यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता.
मिहीर महाजन यांनी यांनी दिल्ली येथे २०२० च्या ऑकटोबर महिन्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत दापोलीतील हर्णे येथे गोवा किल्ला ते सुवर्णदुर्ग किल्ला असा समुद्रावरून जाणारा रोपवे करण्याची मागणी केली असता ” महाराष्ट्र शासनाकडून प्रस्ताव करून आणा मी हा रोपवे करून देतो, असे आश्वासन ना. गडकरी यांनी दिले होते.
मधल्या काळात श्री. महाजन यांनी शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यासाठी विधान परिषदेच्या भाजपच्या आमदार उमाताई खापरे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांची भेट घेत या रोपवेसाठी आग्रह धरला असता, त्यांनी पर्यटन विभागाला तसा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले.
पुरातत्व विभागाची देखील म्हत्वाची भूमिका असल्याने तत्कालीन सांस्कृतिक विभागाचे मंत्री मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची भेट घेत या रोपवेला गती करून ऐतिहासिक सुवर्णदुर्ग किल्ल्याचा विकास करण्याची मागणी केली. विषयाचे महत्व लक्षात घेऊन तत्काळ मा.सुधीरभाऊ यांनी केन्द्रीय मंत्री नितीन गडकरी यांना रोपवेची शिफारस करणारे पत्र दिले.

दरम्यानच्या काळात चिंचवड येथे ना. नितीन गडकरी यांची पुन्हा भेट घेऊन , रोप वे च्या कामाला अंतिम मंजुरी देण्याचा श्री. महाजन यांनीआग्रह धरला. महायुतीच्या सरकारच्या दि. १८ फेब्रुवारीच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये या रोपवेला हिरवा कंदील देण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या पर्वतमाला योजनेअंतर्गत गोवा किल्ला- सुवर्णदुर्ग किल्ला हा रोपवे घेण्यात आला असून, केंद्र सरकारचे NHLM आणि महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग या रोपवेचे काम कार्यान्वित करणार असल्याचा शासन निर्णय दि. १९ मार्च रोजी काल झाला आहे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी असणाऱ्या आणि सरखेल कान्होजी आंग्रेंचे जन्मस्थान असणाऱ्या सुवर्णदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी रोप वे झाल्याने दापोलीचे ऐतिहासिक,सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्रातील महत्व अधोरेखित होणार आहे.
विशेषत्वाने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेला देखील मोठी चालना मिळणार असून दापोलीचे आमदार व गृहराज्यमंत्री योगेश दादांच्या नेतृत्वात हा प्रकल्प पूर्णत्वाला जाण्याची खात्री आहे, असे श्री. महाजन यांनी म्हटले आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीनजी गडकरी , महाराष्ट्राचे मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यमंत्री आणि दापोलीचे आमदार योगेश कदम, मा. मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि विधान परिषद आमदार उमाताई खापरे यांचे मोलाचे मार्गदर्शन, सहकार्य या रोप वे साठी लाभले असल्याने समस्त दापोलीकरांच्या वतीने मिहीर महाजन यांनी आभार मानले आहेत.