‘दिवा-सावंतवाडी’चा ए. सी. प्रवासालाही प्रवाशांची पसंती!
रत्नागिरी : मागील चार महिन्यांपासून दिवा- सावंतवाडी एक्सप्रेसला (10105/10106) पहिल्यांदा जोडण्यात आलेले वातानुकूलित डबे प्रवाशांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत. पूर्वीची दिवा पॅसेंजर आणि आता एक्सप्रेस म्हणून धावत असलेल्या मडगाव- सावंतवाडी- दिवा गाडीला जोडण्यात आलेले वातानुकूलित डबे आता कायमस्वरूपी राहण्याच्या मार्गावर आहेत.
2023 मधील गणेशोत्सवात प्रथमच दिवा -सावंतवाडी एक्सप्रेसला वातानुकूलित इकॉनॉमी थ्री टायर श्रेणीचे दोन डबे जोडण्यात आले. या कोचना लाभत असलेला प्रतिसाद लक्षात घेऊन कोकण रेल्वेने सावंतवाडी दिवा एक्सप्रेसला जोडलेले डबे आजतागायत तसेच ठेवले आहेत. या वातानुकूलित डब्यांना सरासरी 70 टक्क्यांच्या जवळपास प्रवासी भारमान मिळत आहे, रेल्वेच्या दृष्टीने ही समाधानकारक बाब ठरली आहे. याच कारणामुळे कोकण रेल्वेने गणेशोत्सवात तेव्हाची गर्दी लक्षात घेऊन प्रायोगिक तत्त्वावर जोडलेलल्या दोन वातानुकूलित डब्यांना मुदतवाढ दिली आहे.
वातानुकूलित डबे कायमस्वरूपी होण्याच्या मार्गावर!
दिवा-सावंतवाडी एक्सप्रेसला जोडण्यात आलेल्या डब्याना प्रवाशांकडून लाभत असलेला प्रतिसाद लक्षात घेऊन हे डबे कायमस्वरूपी होण्याच्या मार्गावर आहेत. कोकण रेल्वेने या वातानुकली डब्यांमध्ये ऑन बोर्ड हाऊस किपिंग, धावत्या गाडीत बेड रोल पुरवणे, त्यांचे प्रवाशांना वाटप करणे आदी कामांसाठी आजच दिनांक 9 जानेवारी रोजी निविदा देखील काढली आहे. यासाठी दिनांक 29 जानेवारी 2024 पर्यंत निविदा दाखल करायच्या आहेत. सावंतवाडी दिवा एक्सप्रेसच्या एसी डब्यांना लाभत असलेलला प्रतिसाद लक्षात घेऊन रेल्वेने हे पाऊल टाकले आहे.