दिव्यांग व्यक्तींच्या प्रोत्साहनार्थ उद्या दापोलीत सायकल फेरी
दापोली : शारीरिक किंवा मानसिक त्रुटीद्वारे विकलांग बनलेल्या समाजातील घटकांच्या समस्या समजावून घेता याव्यात, म्हणून ३ डिसेंबर या जागतिक दिव्यांग दिवसाची योजना आहे. दिव्यांगांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या उद्धारासाठी हातभार लागावा तसेच समाजातील अन्य लोकांना प्रेरणा मिळावी याबाबत जनजागृतीसाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवार, ३ डिसेंबर २०२३ रोजी सायकल फेरीचे आयोजन केले आहे.
ही सायकल फेरी आझाद मैदान दापोली येथून ७:३० वाजता सुरु होईल. ती उदयनगर, लष्करवाडी, बहुविकलांग दिव्यांग मुलांचे शिक्षण व पुनर्वसन केंद्र जालगाव, बर्वे आळी, पांगारवाडी, शिवाजीनगर, इंदिराबाई वामन बडे कर्णबधीर विद्यालय, आझाद मैदान अशा ६ किमीच्या मार्गावर असेल. समारोप आझाद मैदानात सकाळी ९:३० वाजता होईल.
या सायकल फेरी दरम्यान बहुविकलांग दिव्यांग मुलांचे शिक्षण व पुनर्वसन केंद्र जालगाव आणि इंदिराबाई वामन बडे कर्णबधीर विद्यालय येथे जाऊन शाळेबद्दल, तिथे राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांबद्दल माहिती करुन घेण्यात येईल. आपल्यातले काहीजण शरीराने धडधाकट असूनही नेहमी रडत असतात किंवा नाराज असतात. याउलट काही दिव्यांग व्यक्ती अपंगत्वावर मात करुन यशस्वीपणे सुखी समाधानी जीवन जगत आहेत. हे जाणून घेण्यासाठी आणि जन्मतः शारीरिक, मानसिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या व्यक्तींचे मनोबल वाढविण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही सायकल फेरी असेल. सहानुभूती नको, फक्त विश्वास दाखवा ही त्यांची माफक अपेक्षा असते.
या सायकल फेरीसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. सर्व वयोगटातील सायकल प्रेमी सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क नंबर ८६५५८७४४८६, ८३०८३६६३६६ हे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकल बद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे विनामूल्यपणे सायकल विषयक अनेक उपक्रम राबवले जातात. सर्वांनी यामध्ये सहकुटुंब, सहपरिवार सहभागी व्हा आणि आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.