अजब-गजबब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयलोकल न्यूज

देवरुखमधील धनेशमित्र संमेलनाने दाखवली धनेश संवर्धनाला दिशा

  • धनेशाच्या अधिवासाचे पुनरुज्जीवन आवश्यक !

देवरुख दि. २४ : कोकणातील धनेश पक्ष्यांच्या संवर्धनासाठी त्याच्या ढोल्यांचे संरक्षण आणि नोंदणी, अधिवासाचे पुनरुज्जीवन, खाद्यफळांच्या वृक्षांची लागवड, खाजगी जागेतील धनेश पक्ष्यांच्या ढोल्यांचे संवर्धन आणि जनजागृती या पातळ्यांवर काम करणे आवश्यक असल्याचा उहापोह शनिवारी दि. २३ मार्च रोजी देवरुखमध्ये पार पडलेल्या ‘धनेशमित्र संमेलना’त करण्यात आला. कोकणात पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांनी एकत्र येऊन स्थापन केलेले ‘धनेशमित्र निसर्ग मंडळ’ आणि देवरुख मधील ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’च्या संकल्पनेतून हे संमेलन आयोजित करण्यात आले होते.

देवरुखमधील आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातील एस.के.पाटील सभागृहात शनिवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत महाराष्ट्रातील पहिले ‘धनेशमित्र संमेलन’ पार पडले. या संमेलनाला ‘नेचर काॅन्झर्वेशन फाऊंडेशन’ आणि ‘गोदरेज कन्झुमर प्रोडक्ट्स लिमिटेड आणि एन वी इको फार्म’ यांनी अर्थसहाय्य पुरवले. संमेलनाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी व्यासपीठावर ‘देवरुख शिक्षण संस्थे’चे अध्यक्ष सदानंद भागवत, ज्येष्ठ वन्यजीव संशोधक भाऊ काटदरे, ए.एस.पी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. नरेंद्र तेंडोलकर, रत्नागिरीचे मानद वन्यजीव रक्षक निलेश बापट, ‘नेचर काॅन्झर्वेशन फाऊंडेशन’चे वन्यजीव संशोधक डाॅ. रोहित नानिवडेकर आणि वनस्पती अभ्यासक डाॅ. अमित मिरगल हे उपस्थित होते.

“कोकणात ककणेर म्हणून ओळख असलेल्या या पक्ष्याच्या संवर्धनासाठी दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक आहे. कोकणात केली जाणारी निसर्गाची पूजा हीच वन्यजीव संवर्धनाचा पाया आहे,” असे प्रास्ताविक सदानंद भागवत यांनी केले. ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’चे कार्यकारी संचालक प्रतीक मोरे यांनी संमेलनाच्या पहिल्या सत्रात कोकणातील धनेश पक्ष्यांच्या नोंदीविषयी माहिती दिली. सीसीटीव्ही कॅमेरा लावून देवरुखमध्ये धनेश पक्ष्यांच्या प्रजनन क्रिया कशा पद्धतीने नोदवल्या जात आहेत, याविषयी त्यांनी पुढे माहिती दिली.

डाॅ. रोहित नानिवडेकर यांनी खुल्या स्वरूपाच्या चर्चासत्रामधून स्थानिकांना कोकणात धनेश पक्ष्यांच्या संवर्धनामध्ये असलेल्या आव्हानांविषयी बोलते केले. यावेळी स्थानिकांनी धनेशाला असलेल्या धोक्यांची यादी तयार केली. हवामान बदलामुळे घरट्यांवर होणारा प्रभाव तपासण्यासाठी वर्षांनुवर्षांच्या नोंदी आणि मोठ्या संख्येने धनेशाच्या घरट्यांचे निरीक्षण नोंदवणे आवश्यक आहे. हे निरीक्षण ‘सिटीझन सायन्स प्रोग्राम’अंतर्गत करता येऊ शकते, असे मत नानिवडेकर यांनी सत्राअंती मांडले. या सत्रानंतर ‘महाएमटीबी’ आणि ‘द हॅबिटॅट्स ट्रस्ट’ निर्मित महाधनेश पक्ष्यावरील माहितीपटाचे सादरीकरण झाले. यावेळी पर्यावरण प्रतिनिधी अक्षय मांडवकर उपस्थितांशी संवाद साधला. धनेश पक्ष्यांना असणाऱ्या धोक्यांवर मात करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहेत, यावर खुल्या स्वरुपातील चर्चा सत्र पार पडले. कमी वेगाने वाढणाऱ्या झाडांचे ‘इन-सिटू’ पद्धतीने संवर्धन करुन, वेगाने वाढणाऱ्या प्रजाती या धनेशाच्या अधिवास संवर्धनाच्या प्रकल्पामध्ये वापरणे आवश्यक असल्याचे मत वनस्पती अभ्यासक डाॅ. अमित मिरगल यांनी मांडले.

धनेश पक्ष्यांच्या अधिवासाच्या पुनरुज्जीवनाविषयी नानिवडेकर यांनी प्रमुख मुद्दे मांडले. धनेशाच्या संवर्धनाच्या कामात येणारा सर्वात मोठा अडथळा म्हणजे स्थानिक झाडांच्या रोपांची उपलब्धता. मोठ्या संख्येने स्थानिक झाडांची रोपे तयार करणाऱ्या रोपवाटिकांना प्रोत्साहन देणे, हे धनेशाच्या अधिवास संवर्धनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असे प्रतिपादन नानिवडेकर यांनी केले. त्यानंतर त्यांनी धनेशाचे छायाचित्र करताना कोणती तत्वे पाळावीत, याविषयी महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. सत्रादरम्यान धनेश पक्ष्यांविषयी वेगवेगळे खेळ पार पडले. धनेश संवर्धनाविषयी या संमेलनामधून नोंदवलेले प्रमुख मुद्दे हे सरकार दरबारी मांडण्यात येणार आहेत. सृष्टीज्ञान संस्था, देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ, सह्याद्री निसर्ग मित्र – चिपळूण, एन व्ही इको फार्म गोवा, महाराष्ट्र वन विभाग आणि निसर्ग सोबती – रत्नागिरी यांच्या सहकार्याने हे संमेलन पार पडले.

धनेशमित्र पुरस्कार

कोकणात धनेश पक्ष्यांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा संमेलनामध्ये धनेशमित्र पुरस्काराने सन्मान करण्यात आला. देवळे गावातील धनेशमित्र भरत चव्हाण, डॉ शार्दुल केळकर, डाॅ. अमित मिरगळ, राजापूरचे धनेशमित्र धनंजय मराठे, निसर्गाची राजदूत तनुजा माईन आणि पर्यावरण पत्रकार अक्षय मांडवकर यांचा ‘धनेशमित्र’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तसेच कोंसुब, आंगवली, देवळे, देवडे, किरबेट, धामणी या ग्रामपंचायतींनी देखील धनेशाच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतल्याने त्यांचा देखील सन्मान करण्यात आला.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button