‘देवरूखच्या राजा’ला वाजत-गाजत भावपूर्ण वातावरणात निरोप
२१ दिवस साजरा होतो गणपती उत्सव
देवरूख (सुरेश सप्रे): देवरूख पोलिस वसाहती शेजारील पोलिसांचा देवरुखचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या शहरातील हनुमान मंदिरातील गणरायाला २१व्या दिवशी आज सोमवारी सायंकाळी वाजत गाजत मिरवणुकीने भावपूर्ण निरोप दिला.
जय हनुमान मित्र मंडळ देवरुख व पोलीस कर्मचारी देवरुख यांच्या वतीने हनुमान मंदिरात गेली अनेक वर्षे २१ दिवस गणेशोत्सव साजरा केला जात आहे. पोलिस कर्मचाऱ्यांना गणपती उत्सवात २४तास सेवा बजवावी लागते त्यामुळे त्यांना स्वतच्या घरच्या गणपती उत्सवात सहभागी होता येता नाही म्हणून हा उत्सव भक्तिभावाने साजरा होऊन पोलिसांना ही मनोभावे सहभागी होता यावे म्हणून हा नवसाला पावणार म्हणून ख्याती असलेल्या गणरायाची सेवा २१ दिवस केली जाते. श्रींच्या दर्शनासाठी भक्तांची रीघ लागते.
यावर्षी उत्सव विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमानी साजरा करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी हि देवरूखात येत या गणरायाचे दर्शन घेत.. या उपक्रमांचे कौतूक केले.
विसर्जन मिरवणुकीत गणेशभक्तांसह पोलिस कर्मचारी व कुटूंबीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.. सैतवडे येथिल बेंजो पथक मिरवणुकीचे आकर्षण ठरले.
देवरूख हनुमान मंदिरापासून सांयकाळी सुरू झालेली बाप्पाची विसर्जन मिरवणुक स्टेट बँक रोडमार्गे बसस्थानक, बाजारपेठ, खालची आळी, मच्छीमार्केट अशी काढण्यात येवून रात्री उशिरा सप्तलिंगी नदीपात्रात देवरूखच्या राजाला गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत जड अंतःकरणाने भावपूर्ण निरोप दिला गेला..