धक्कादायक!! आईनेच पोटच्या पाच वर्षांच्या चिमुकल्याला विकले!

दापोली : आईकडून मुलाची विक्री, दोघांविरुद्ध गुन्हा दापोली : तालुक्यातील एका मातेने आर्थिक फायद्यासाठी आपल्या ५ वर्षीय चिमुकल्या मुलाला विकल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी दापोली पोलिसांकडून त्या मातेसह सत्यवान दत्ताराम पालशेतकर (५२, बो कारुळ, गुहागर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जून रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या दरम्यान गुहागर एसटी स्टँडसमोर ही माता आपल्या मुलाला घेऊन गेली होती. त्यावेळी सत्यवान पालशेतकर हा तेथे मुलाला खरेदी करण्यासाठी आला होता. स्वतःला आर्थिक फायदा मिळविण्याच्या उद्देशाने मुलाच्या मातेनेच आपल्या मुलाची विक्री केल्याचे पुढे येत आहे. सत्यवान पालशेतकर या मुलाची खरेदी करणार असल्याने त्या मूल विकणाऱ्या मातेसह दोघांवर दापोली पोलीस ठाण्यात बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ चे कलम ८१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक पूजा हिरेमठ करीत आहेत.