नगर परिषद कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाई करा

- बहुजन समाज पार्टीचा रत्नागिरी नगर परिषद प्रशासनाला निवेदनातून इशारा
रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील मुकादम मनोहर काशिनाथ कदम यांना “ऑन ड्युटी” असताना झालेल्या मारहाणीप्रकरणी बहुजन समाज पार्टीने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
ही घटना बुधवार, दि. २ जुलै रोजी राजीवडा येथे घडली. माजी नगरसेवक साजिद पावसकर यांनी केवळ फोन न घेतल्याच्या कारणावरून मनोहर कदम यांना कामावर असतानाच मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाण झालेली वेळ, ठिकाण आणि कारण पाहता हा गंभीर प्रकार असून त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याची भावना बहुजन समाज पार्टीने मांडली आहे. या घटनेचा निषेध करत बहुजन समाज पार्टीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्याकडे निवेदन सादर केले. यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.
बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले की, नगर परिषदेमधील अनेक कर्मचारी बहुजन समाजातून येतात. आरोग्य आणि पाणी पुरवठा विभागात काम करणारे कर्मचारी पहाटेपासून मेहनतीने जबाबदारी पार पाडतात. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी प्रशासनाची असून अशा घटनांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे त्यांच्या जिविताला धोका निर्माण करणे होय. या घटनेवर केवळ माफी मागून विषय गुंडाळणे योग्य नाही; संबंधितांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका बहुजन समाज पार्टीने घेतली आहे.
या प्रकाराची पुनरावृत्ती झाल्यास गंभीर आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही पक्षाने दिला आहे. या वेळी रत्नागिरी शहराध्यक्ष रुपेश कांबळे, जिल्हाप्रभारी अनिकेत पवार, माजी विधानसभा महासचिव किशोर पवार, दीपक आयरे आणि राकेश पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.