नवनिर्वाचित उद्योग मंत्री उदय सामंत यांचे रत्नागिरीत जंगी स्वागत
रत्नागिरी : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये पुन्हा एकदा मंत्री बनलेल्या उदय सामंत यांचे त्यांच्या पाली या निवासस्थान असलेल्या गावासह रविवारी रत्नागिरी शहरात जोरदार स्वागत करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून रखडलेले महायुती सरकारचे खाते वाटप दोन दिवसापूर्वी जाहीर झाले. त्यानुसार आधी उद्योग मंत्री असलेल्या रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांना पुन्हा एकदा उद्योग खाते देण्यात आले आहे. नव्या सरकारमध्ये उद्योग मंत्री पद मिळाल्यानंतर प्रथमच रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या ना. उदय सामंत यांचे रविवारी डीजेच्या तालावर, फटाक्यांच्या जोरदार आतषबाजीत तसेच फुलांचा वर्षाव करीत स्वागत करण्यात आले.
रत्नागिरी शहरात अवाढव्य जेसीबीमधून त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर पुष्पृष्टी केली. रविवारी सायंकाळी मारुती मंदिर ते जयस्तंभ पर्यंत काढण्यात आलेल्या त्यांच्या स्वागत मिरवणुकीत रस्त्याच्या दुतर्फा चाहत्यांची तुफान गर्दी झाली होती. या कालावधीत शहरात काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. मुंबईवरून त्यांचे रविवारी आधी पाली येथील त्यांच्या निवासस्थानी आगमन झाले. तेथे त्यांच्या मातोश्री सौ. स्वरूपा सामंत यांनी त्यांचे औक्षण केले.