नाचणे रस्त्यावर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे असह्य दुर्गंधी
- रोगराई पसरण्याची भीती ; ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
रत्नागिरी : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जयसिंग घोसाळे यांच्या नाचणे रस्त्यावरील घराच्या शेजारी असणाऱ्या रिकाम्या जागेला अक्षरशः कचराकुंडीचे स्वरूप आले असून, ग्रामपंचायतीचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे.
यातील बहुतांशी कचरा कुजला असून, परिसरात त्याची दुर्गंधी पसरली आहे. पावसाळ्यातील रोगराईला हा कचरा निमंत्रण देऊ शकतो. सध्या डेंग्यूची साथ सुरू आहे. त्यामुळे हा कचरा तातडीने हटवणे गरजेचे आहे. या जागेत गुरांचा मुक्त संचार असतो, तेथील कचरा ही गुरे खात असतात. कुत्रीही हा कचरा विखरून टाकतात, त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातही हा कचरा जात आहे.
या रिकाम्या जागेत एक खड्डादेखील असून त्यात पाणी साचलेले असते. लहान मुलांना त्याचा धोका संभवतो. याबाबत आजूबाजूच्या नागरिकांनी ग्रामपंचायतीला अनेकदा कळवले आहे. मात्र त्याची दखल घेतली गेलेली नाही. रोगराई पसरून याठिकाणी दुर्घटना घडल्यानंतर ग्रामपंचायतीला जाग येणार आहे का, असा संतप्त प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत.