नारळ विकास मंडळाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा

- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले
रत्नागिरी : कृषी विभाग व नारळ विकास मंडळ, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयात नारळ विकास मंडळाच्या योजनांचा अभिमुखता कार्यक्रमाचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपसंचालक बी. चिन्नराज, व नारळ विकास मंडळ ठाणेचे विकास अधिकारी रविंद्र कुमार तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी तसेच श्री. स्वराज्य ग्रुपचे अध्यक्ष तुषार आग्रे हे उपस्थित होते.
उपसंचालक बी. चिन्नराज यांनी नारळ लागवड साहित्य उत्पादन, नारळाचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्याचे योजना, नारळाचे मुल्यवर्धन व विपणन करणे, नारळ प्रसिध्दी विस्तार व कौशल्य विकास, नारळ विमा योजना आदी नारळाच्या विविध योजनांबाबत माहिती दिली. नाविन्यपूर्ण योजनांमध्ये नारळ बागेमध्ये वैयक्तिक व सामुहिक शेततळे योजना, नारळ बागेतील सेंद्रिय शेती योजना, यांत्रिकीकरण, यांसारख्या योजनांची माहिती दिली.
स्वराज्य ग्रुपचे अध्यक्ष, श्री.आग्रे यांनी रत्नागिरीमध्ये सुरु होत असलेल्या कनेक्ट कोकोनट ट्री या महत्त्वकांक्षी प्रकल्पाची माहिती उपस्थितांना दिली. नारळ संसाधन व्यक्ती निवड करणे बाबतचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री.सदाफुले, यांनी नारळ विकास मंडळाच्या विविध योजनांची माहिती रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे उपस्थित सर्व अधिकारी यांना आवाहन केले.