निसर्गसेवक कै. नीलेश विलास बापट यांचे नाव वन विभागाच्या कलादालनाला देण्याची मागणी

- चिपळूणच्या सक्रीय निसर्गप्रेमींकडून वनमंत्र्यांना निवेदन
मुंबई :: रत्नागिरी जिल्हा वनविभाग (चिपळूण) यांच्याकडून चिपळूण येथे उभारण्यात आलेल्या कलादालनाला मानद वन्यजीव रक्षक (रत्नागिरी) स्व. निलेश विलास बापट यांचे नाव देण्याबाबतचे निवेदन आज शहरातील सक्रीय निसर्गप्रेमी यांच्या शिष्टमंडळाने, आ. शेखर निकम यांच्या सहकार्याने, राज्याचे वनमंत्री ना. गणेश नाईक यांना सादर केले.
‘आपल्या प्रस्तावावर वाचून निर्णय घेतो’ असे यावेळी ना. नाईक यांनी सांगितले. पर्यावरण प्रेमींनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्याशीही याबाबतचर्चा करून निवेदन दिले होते. या विषयात त्यांचेही सहकार्य लाभते आहे.
रत्नागिरी जिल्हा वनविभाग यांनी जिल्हा नियोजन मंडळामार्फत एक छोटेखानी व सुंदर कलादालन उभारण्यात आलेले आहे. या कलादालनाची मूळ संकल्पना आणि मांडणी ही जिल्ह्याचे तत्कालिन मानद वन्यजीव रक्षक निलेश बापट यांची होती. याची चिपळूणातील पर्यावरणप्रेमी यांना पूर्ण कल्पना आहे. याकारणे चिपळूण वनविभाग संकुलात येथे उभारलेल्या कलादालनाला निसर्गसेवक के. निलेश विलास बापट यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी आहे.
भारतभरातील जंगलांचि चिकित्सक अभ्यासक आणि रत्नागिरी जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक के. निलेश विलास बापट यांनी त्यांचे संपूर्ण जीवन हे निसर्ग, पर्यावरण, जंगल आणि वन्यजीव यांच्या संरक्षण आणि संवर्धनाकरिता वाहून घेतले होते. सह्याद्री निसर्ग मित्र, ग्लोबल चिपळूण आणि आरोही या संस्थांचेही ते संस्थापक सदस्य होते. त्यांना या क्षेत्रातील विविध पुरस्कार प्राप्त झाले होते. त्यांचे गतवर्षी, १४ सप्टेंबर २०२४ रोजी वयाच्या अवघ्या ४७व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. आपल्या असाधारण बुद्धिमत्तेच्या बळावर जणू एखादं वर्तमानपत्र वाचावं तसा अवघा निसर्ग वाचत होते. ते भारतभरातील जंगलांचे, संपूर्ण सह्याद्रीचे अभ्यासक होते. ‘सह्याद्री टायगर रिझर्व्ह’च्या उभारणीतील योगदान हा त्यांच्या जीवनाचा सर्वोच्च कार्यटप्पा ठरला. त्यांनी मागील तीन दशकांहून अधिक काळ जैवविविधता, वन्यजीवन, निसर्ग आणि पर्यावरण आदी संवर्धन क्षेत्रात कार्य केले. भारतातील ताडोबा, पेंच, बांधवगड, रणथंबोर, STR, नागझिरा, दांडेली, कान्हा आदी जंगलांमध्ये निसर्ग प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वी केल्या. किमान हजारभर शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नेचर एज्युकेशन, नेचर वॉक संस्थेमार्फत वाईल्ड इंडिया फिल्म फेस्टिव्हल आदींच्या माध्यमातून ‘गेस्ट लेक्वरर’ म्हणून निसर्ग विषयक ध्वनीचित्रफीती, चित्रप्रदर्शनांच्या माध्यमातून तरुणाईच्या निसर्गविषयक जाणीवा समृद्ध करण्यात त्यांनी योगदान दिले.
वनविभागासोबत अनेक ‘वाईल्डलाईफ रेस्क्यू ऑपरेशन्स’ यशस्वी करणे, वाट चुकलेले असंख्य अजगर, बिबटे, मगरी यांना त्यांच्या अधिवासात नेऊन सोडणे, महापुराच्या संकटात अनेकांना मदत, नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण रक्षणाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठीचे कार्यक्रम, वन विभागाच्या वन्यजीव सप्ताहांतर्गत ऑनलाईन वेबिनार, क्षेत्रभ्रमंती, निसर्ग अभ्यास सहली, ग्रामस्थ समुपदेशन, औषधी वनस्पती लागवड, मानव-वन्यजीव संघर्ष, अन्न साखळीतील वन्यजीवांचे महत्त्व अशा कितीतरी विषयांवर त्यांचे योगदान दिशादर्शक राहिले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प भागातील घनदाट जंगलात पाणवठे निर्मिती, पुरातन विहिरी आणि जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन, गाईड ट्रेनिंग प्रोग्रॅम त्यांनी परिणामकारकरीत्या यशस्वी केले होते.
चिपळूण पर्यावरणप्रेमींच्या शिष्टमंडळात ग्लोबल चिपळूण टुरिझमचे अध्यक्ष श्रीराम रेडीज, जलदुत शहानवाज शाह, लेखक आणि पर्यावरण-पर्यटन क्षेत्रातील कार्यकर्ते धीरज वाटेकर, पर्यटन अभ्यासक समीर कोवळे, चिपळूणला पहिले कृषी पर्यटन उभे करणारे विलास महाडिक यांच्यासह नितीन उर्फ अबुशेठ ठसाळे उपस्थित होते. या निवेदनाला पाठिंबा देणारी, ग्लोबल चिपळूण टुरिझम, सह्याद्री निसर्ग मित्र, वाईल्डलाईफ अनलिमिटेड, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, अर्थ फौंडेशन, अरण्यवाट, सेवासाधना केतकी, श्रमिक सहयोग, महेंद्रगिरी निसर्गमित्र, कोकण सिरत कमिटी, नवकोकण एज्युकेशन सोसायटी, रंजिता चॅरिटेबल फौंडेशन, अग्रीमा महिला संघ रत्नागिरी जिल्हा, शिवसेना युवासेना चिपळूण, पक्षीमित्र नयनीश गुढेकर, प्रकाश (बापू) काणे, युयुत्सु आर्ते, श्री परशुराम सान्निध्य निसर्ग पर्यटन केंद्र, कोशिश फौंडेशन, चिपळूण सायकल क्लब, सह्यसागर संस्था आदी संस्थांची पत्रे वनमंत्र्यांना निवेदनासोबत देण्यात आली आहेत.