पुढील दोन वर्षात रत्नागिरी स्मार्ट सीटी : पालकमंत्री डॉ. उदय सामंत

- स्मार्ट सिटी योजनेतंर्गत दामले विद्यालय नूतन इमारतीचे भूमिपूजन
रत्नागिरी, : एमआयडीसीने रत्नागिरी शहर दत्तक घेतले आहे. साडेचारशे कोटी रुपये दिले आहेत. रत्नागिरी बदलतंय..रत्नागिरी बदललंय..येत्या दोन वर्षात स्मार्ट शहर म्हणून रत्नागिरी उभे राहणार आहे. आधुनिकदृष्ट्या, सकारात्मकदृष्ट्या रत्नागिरी पुढे जात आहे, असे सांगून डोळस पध्दतीने पहा, चांगली कामे निश्चित दिसतील. त्यावर चर्चा करा, असे पालकमंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले.
एमआयडीसी विशेष निधीमधून स्मार्ट सिटी योजनेतंर्गत नगर परिषदेच्या दामले विद्यालय नूतन इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते आज कुदळ मारुन आणि कोनशिला अनावरण करुन झाले. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, डाएटचे प्राचार्य सुशील शिवलकर, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसिलदार राजाराम म्हात्रे, मुख्याधिकारी तुषार बाबर, भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार साळवी, डॉ. शिरीष शेणई, बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲङ दिलीप धारिया, ॲड. फजल डिंगणकर, डॉ.सुमेधा करमरकर, आनंद फडके, राहुल पंडित, बिपिन बंदरकर, शिल्पाताई सुर्वे, श्रध्दा हळदणकर, राजन शेट्ये आदी उपस्थित होते.
15 कोटी 38 लाखाचा निधी
पालकमंत्री डॉ.सामंत म्हणाले, राज्यात नावारुपाला आलेल्या दामले विद्यालयात पहिली ते दहावी असणाऱ्या वर्गात 1300 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याचा सर्वांना अभिमान असला पाहिजे. राज्यात अन्य शाळांची परिस्थिती पाहिल्यास दामले विद्यालयात प्रवेशासाठी रांगा लागतात त्याबद्दल पालकांना धन्यवाद देतो आणि इथल्या शिक्षकांचे कौतुक करतो.
एमआयडीसीने दिलेल्या 15 कोटी 38 लाख रुपयांमधून खासगी शाळांपेक्षाही सुंदर, टुमदार इमारत राज्यात नगर परिषदेच्या शाळेची, दामले विद्यालयाची होत आहे. खासगी शाळांसारख्या चांगल्या सुविधा शासकीय शाळांसाठी दिल्यास, विद्यार्थी येवू शकतात. ही सुरुवात रत्नागिरीतून झालेली आहे. ही शाळा राज्यात आदर्श ठरावी.
जीडीपी वाढीतील राज्यातील पाच जिल्ह्यात रत्नागिरी
स्मार्ट शहरासाठी एमआयडीसीने दिलेल्या साडेचारशे कोटी रुपयांमधून दर्जेदार चांगली कामे नगरपरिषदेने कंत्राटदाराकडून करुन घ्यावीत, असे सांगून पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, राज्यातील सुंदर शहर असणाऱ्या बारामतीतील लोक आपले शहर पहायला येतील, असे मी सांगितले होते. नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा रत्नागिरीत येवून गेले. इथे झालेली कामे पाहून गेले. असे प्रकल्प राज्यात उभे करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला. गेल्या तीन वर्षात राज्यात जीडीपी वाढविण्यात आम्ही यशस्वी झालो आहे. रत्नागिरी पर्यटन जिल्हा असल्याने हजारो पर्यटक इथे भेट देत आहेत. माहिती घेतल्यावर समजले सर्व हॉटेल्स आरक्षित असतात. भविष्यात जीडीपी वाढीतील राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी हा एक जिल्हा असेल.
तीन महिन्यात अंमली पदार्थ मुक्त जिल्हा
अंमली पदार्थ प्रकरणात पकडलेल्या आरोपीला सोडण्यासाठी फोन करणाऱ्या पुढाऱ्याचे नाव पोलीसांनी डायरीत नोंदवावे व त्याचे नाव पत्रकार परिषदेत सांगावे. अंमली पदार्थ देणाऱ्यावर आणि घेणाऱ्यावर गुन्हा दाखल होणार आहे. अंमली पदार्थाच्या आहारी तरुण पिढी जाणार नाही, ही जबाबदारी पालक आणि शिक्षकांची आहे. अंमली पदार्थामुळे कुटूंब, आयुष्य बरबाद होत आहे. अमंली पदार्थाचे सेवन करण्यापासून दूर रहा. अंमली पदार्थांच्या विरोधात पालकांनी आणि शिक्षकांनी पुढे यावे. पुढच्या तीन महिन्यात अंमली पदार्थ मुक्त झालेला जिल्हा ऐकायला मिळेल याकडे डोळसपणे पहा, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.
मुख्याध्यापक भगवान मोटे यांनी प्रास्ताविक केले. इस्त्रोला जायला संधी मिळालेल्या पाच विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्यांना पुष्पगुच्छ देवून धन्यवाद दिले. सई जाधव या विद्यार्थींनीने इस्त्रो भेटीचा अनुभव सांगितला.
अशी असेल नवी इमारत
- दामले विद्यालयाची स्थापना 1919
- रत्नागिरी नगरपरिषदेकडे 1975 साली हस्तांतरित
- प्रस्तावित इमारतीची तळमजला, पहिला मजला व दुसरा मजला अशी संरचना
- प्रती मजल्याचे क्षेत्रफळ 1359.74 चौ. मीटर
- एकूण बिल्टअप क्षेत्रफळ 4379.22 चौ. मीटर
- प्रशासक विभाग, लेखा विभाग, कारकुनी विभाग, बैठक खोली, अभिलेख कक्ष, वर्गखोल्या, प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक विभाग, स्वयंपाकखोली, शौचालय व इतर
- मैदानाची सुविधा- विविध खेळांचे प्रशस्त कक्ष, लहान मुलांकरिता बगीचा, सँडपीट, व्यायामशाळा, खुले खेळाचे मैदान
कार्यक्रमाला पालक, शिक्षक, आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.