महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सशिक्षण

बारावीच्या ऑनलाईन परीक्षेत आता स्क्रीन रेकॉर्डिंग!

  • मंडळाकडून कॉपी बहाद्दरांवर होणार ‘सर्जिकल स्ट्राईक’!

रत्नागिरी : चालू मार्च २०२६ मध्ये होणारी बारावीची माहिती तंत्रज्ञान (IT) आणि सामान्यज्ञान (GK) विषयांची ऑनलाईन परीक्षा ही केवळ साधी परीक्षा नसून, ती तांत्रिकदृष्ट्या अतिशय सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळाने कठोर उपाययोजना केल्या आहेत. यंदा या परीक्षेत होणाऱ्या गैरप्रकारांना चाप लावण्यासाठी चक्क ‘डिजिटल’ लॉक लावण्यात आले असून, कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी स्वतः एका केंद्रावर विद्यार्थ्याच्या भूमिकेत शिरून ‘डेमो एक्झाम’ दिली. परीक्षार्थी म्हणून प्रत्यक्ष अनुभव घेत त्यांनी सर्व तांत्रिक बदलांची खातरजमा केली, राज्य मंडळाकडून पहिल्यांदाच स्क्रीन रेकॉर्डिंगचा अभिनव प्रयोग या परीक्षेत होणार आहे.

पाच जिल्ह्यांची सांख्यिकी-
कोल्हापूर आणि कोकण विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये ही ऑनलाईन परीक्षेची रणधुमाळी रंगणार आहे. यामध्ये एकूण ३१,५२५ परीक्षार्थी आपले नशीब अजमावणार आहेत. जिल्हानिहाय चित्र खालीलप्रमाणे आहे:

कोल्हापूर जिल्ह्यात ११२ आयटी केंद्रांवरून १३,२७८ विद्यार्थी आणि एका विशेष जीके केंद्रावरून ७४ विद्यार्थी असे एकूण १३,३५२ विद्यार्थी सामोरे जातील. सातारा जिल्ह्यात ७६ आयटी केंद्रांवरून ८,३६० विद्यार्थी आणि एका जीके केंद्रावरून २ विद्यार्थी असे एकूण ८,३६२ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. सांगली जिल्ह्यात ५५ आयटी केंद्रांवरून ४,५७० विद्यार्थी आणि एका जीके केंद्रावरून २८ विद्यार्थी मिळून एकूण ४,५९८ विद्यार्थी परीक्षा देतील. रत्नागिरी जिल्ह्यात ५० आयटी केंद्रांवरून ३,१४१ विद्यार्थी आणि एका जीके केंद्रावर ३८ विद्यार्थी अशी एकूण ३,१७९ संख्या आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २९ आयटी केंद्रांवरून १,९९४ विद्यार्थी आणि एका जीके केंद्रावरून ४० विद्यार्थी मिळून एकूण २,०३४ विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देतील. संपूर्ण कोल्हापूर शैक्षणिक विभागाचा विचार केल्यास एकूण ३२२ आयटी केंद्रांवर ३१,३४३ विद्यार्थी आणि ५ विशेष जीके केंद्रांवर १८२ विद्यार्थी असे एकूण ३१,५२५ विद्यार्थी ही परीक्षा देतील.

हायटेक सुरक्षा यंत्रणा: आता लपूनछपून काहीच चालणार नाही!
यंदाच्या परीक्षेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ‘स्क्रीन रेकॉर्डिंग’. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्याच्या संगणकावर काय हालचाली सुरू आहेत, याचे संपूर्ण रेकॉर्डिंग होऊन ती फाईल ‘सी’ ड्राईव्हमध्ये जतन केली जाणार आहे. यासाठी प्रत्येक पीसीवर ३ जीबी जागा राखीव ठेवण्यात आली आहे. तसेच, ‘ॲप ब्लॉकिंग’ तंत्रज्ञानामुळे परीक्षार्थीला गुगल क्रोम, चॅट जीपीटी, टीम व्ह्यूअर, एनीडेस्क यांसारख्या कोणत्याही बाह्य मदतीचा वापर करता येणार नाही. जर कोणी तसा प्रयत्न केला, तर परीक्षा सॉफ्टवेअरमध्ये आपोआप अडथळा निर्माण होईल. याशिवाय संपूर्ण लॅब सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असेल.

प्रशासकीय आणि तांत्रिक सज्जता-
परीक्षेच्या सुरळीत आयोजनासाठी कोल्हापूर विभागीय सचिव सुभाष चौगुले आणि कोकण विभागीय सचिव पुनीता गुरव यांनी क्षेत्रीय अधिकारी व केंद्र संचालकांना आवश्यक सर्व सूचना दिल्या आहेत.

केंद्र संचालक: प्राचार्य किंवा उपप्राचार्य हे सर्वस्वी जबाबदार असतील.

त्रयस्थ पर्यवेक्षक: यंदा सर्वात मोठा बदल म्हणजे पर्यवेक्षक (Supervisor) हे संबंधित महाविद्यालयाचे नसतील, तर ते त्रयस्थ असतील, ज्यामुळे ‘आपल्या’ विद्यार्थ्याला मदत करण्याचे प्रकार थांबतील.

तांत्रिक सहाय्यक: आयटी शिक्षक केवळ तांत्रिक बिघाड दुरुस्तीसाठी उपलब्ध असतील, एरवी त्यांना लॅबमध्ये प्रवेश नसेल.

समन्वयकांची नियुक्ती: विभागीय स्तरावर श्रीमती सुषमा पाटील (कोल्हापूर) आणि श्री. सचिन नाईक (कोकण) तर जिल्हा स्तरावर सातारा (विशाल शिंदे, किरण शिंदे), सांगली (धनाजी येवडे, शांतीनाथ पाटील), कोल्हापूर (वायकसकर, ज्योती गडगे, निलेश कांबळे), रत्नागिरी (समृद्धी बावधनकर) आणि सिंधुदुर्ग (प्रसन्नकुमार मयेकर) हे तज्ज्ञ तांत्रिक सहकार्य पुरवतील.

वेळापत्रक आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप-
माहिती तंत्रज्ञान (IT): १२, १३ आणि १४ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ ते १.४० आणि दुपारी ३ ते ५.४० अशा दोन सत्रांत परीक्षा होईल. यात रिकाम्या जागा, चूक की बरोबर, बहुपर्यायी प्रश्न आणि HTML कोडिंगवर आधारित प्रश्न असतील.

सामान्यज्ञान (GK): १६, १७ आणि १८ मार्च २०२६ रोजी केवळ खासगी सैनिकी शाळांमधील केंद्रांवर ही परीक्षा पार पडेल. १०० गुणांची ही परीक्षा पूर्णपणे वस्तुनिष्ठ (Objective) असेल.
लेखी परीक्षेप्रमाणेच ऑनलाईन परीक्षेलाही १० मिनिटांचा जादा वेळ दिला असून दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष सवलत लागू असेल.

थेट पोलीस कारवाईचा इशारा!
विभागीय मंडळाने स्पष्ट केले आहे की, गैरप्रकार करणाऱ्यांवर केवळ शैक्षणिक कारवाई होणार नाही, तर महाराष्ट्र अधिनियम १९८२ आणि आयटी ॲक्ट २००० नुसार फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. तोतया परीक्षार्थी आढळल्यास तात्काळ अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हास्तरावरून शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना भरारी पथके आणि बैठी पथके नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

“बारावीची ऑनलाईन परीक्षा लेखी परीक्षेप्रमाणेच गांभीर्याने घेण्यात येईल. गैरप्रकारांना पायबंद घालण्यासाठी आम्ही तांत्रिक व प्रशासकीय अशा दोन्ही पातळ्यांवर कडक तटबंदी केली आहे. पारदर्शकता हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.”

  • राजेश क्षीरसागर, विभागीय अध्यक्ष, कोल्हापूर व कोकण मंडळ.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button