भाजपचे युवा कार्यकर्ते सुशांत पाटकर यांची रत्नागिरी तालुका सरचिटणीसपदी नियुक्ती

रत्नागिरी : रत्नागिरी (दक्षिण) भाजपाच्या नेतृत्त्वात बदल झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी नुकतीच तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या होत्या. रत्नागिरी तालुकाध्यक्ष म्हणून श्री. संयोग (दादा) दळी यांची नियुक्ती करण्यात आली. तालुक्याची कार्यकारिणी घोषित करताना सर्वसमावेशक विचार करत युवा वर्गाला प्रतिनिधित्व देण्याच्या उद्देशाने डोर्ले गावचे सुपूत्र, भारतीय जनता पार्टी रत्नागिरी (दक्षिण)चे ऊर्जावान कार्यकर्ते श्री. सुशांत पाटकर यांची वर्णी लागली आहे.
सुशांत पाटकर अभ्यासू आणि संयमी कार्यकर्ते म्हणून रत्नागिरीतील राजकीय वर्तुळात परिचीत आहेत. ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते बडू पाटकर यांचे चिरंजीव असलेल्या सुशांत यांनी रत्नागिरी पंचायत समितीचे युवा सदस्य म्हणून त्यांनी जनमानसावर चांगलीच छाप पाडली आहे. राजकीय क्षेत्रात कामकाजाचे धडे त्यांनी आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली गिरवले असल्याने भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले असून पुढील काळात त्यांच्या कामाचा आवाका बघून युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस पद पक्षाने बहाल केले होते.
उत्तम वक्तृत्त्व, स्वयंस्फुर्त कार्यकर्ता, जिद्द, चिकाटी आणि अथक मेहनत करण्याची तयारी या जमेच्या बाजू असतानाच नागरिकांशी संपर्क, प्रशासकीय कामांचा अनुभव आणि अचूक निर्णयक्षमता हे गुण हेरून सुशांत पाटकर यांना हे पद मिळाल्याने त्यांचा मित्रपरिवार, स्नेही आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्यांनीही त्यांना उत्तमोत्तम कार्य करा असे आशिर्वाद दिले आहेत.