महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

भाट्ये समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम शनिवारी

  • सर्वांनी सहभाग नोंदवावा – निवासी उपजिल्हाधिकारी

रत्नागिरी, दि.१६ : पर्यावरण, वन व वातावरणीय बदल विभाग मंत्रालयाच्या सूचनेनुसार भाट्ये समुद्र किनारा येथे दि. 20 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता भाट्ये समुद्र किनारा स्वच्छता कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या मोहिमेसोबतच याठिकाणी ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपणही करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सर्वांनी उत्साहाने सहभाग नोंदवावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले.
पर्यावरण, वन व वातावरणीय बदल विभाग मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना व कार्यक्रमाचे स्वरुप अनुषंगाने भाट्ये समुद्र किनारा येथे समुद्र किनारा स्वच्छता मोहीम राबविण्याच्या नियोजनाबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे श्री. सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, पोलीस उपअधीक्षक राधिका फडके, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण दीपक घाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) सागर पाटील, नगरपालिका प्रशासन अधिकारी तुषार बाबर आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. सूर्यवंशी म्हणाले, भाट्ये समुद्र किनारी स्वच्छता मोहिमेच्या अनुषंगाने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयामार्फत मार्गदर्शक तत्वे व कार्यक्रमाचे स्वरुप निश्चित करण्यात आले आहे. भाट्ये समुद्र किनारी दि. 20 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या कंपन्यांना वेगवेगळे बीच स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. यानुसार भाट्ये बीच स्वच्छ व सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी फिनोलेक्स या कंपनीकडे आहे. दरवर्षी बीच क्लीनीगंच्या कार्यक्रमात फिनोलेक्स कंपनीची चांगली मदत होत असते. फिनोलेक्सने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपली जबाबदारी पार पाडावी. समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत नगरपालिका प्रशासनाने याठिकाणी आवश्यक साधनसामुग्री व यंत्रसामुग्री, ट्रॅक्टर, कामगार याचा पुरवठा करावा. ग्रामपंचायतीमधील मशीन्स आणि त्यांचे पथक उपस्थितीबाबतचे नियोजन ग्रामपंचायत विभागाने करावे.
एक पेड माँ के नाम या कार्यक्रमांतर्गत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे. याबाबतच्या नियोजनाबाबत ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायतीला अधिच अवगत करुन त्याचे नियोजन करावे. शासनाकडून देण्यात आलेल्या लिंकवर नोंदणी करावयाची आहे. शिक्षण विभागाने या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पथनाट्याचे आयोजन करावे. आरोग्य विभागाने प्रथमोपचार पेटी पुरवावे. जास्त संख्येने नागरिक याठिकाणी येणार असल्याने मोबाईल टायलेट उपलब्ध करुन द्यावेत, अशा सूचना देतानाच सर्व विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग नोंदवावा, असे आवाहनही निवासी उपजिल्हाधिकारी श्री.सूर्यवंशी यांनी यावेळी केले.

000

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button