भेसळयुक्त पदार्थ आढळल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा

- लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचे आवाहन
उरण (विठ्ठल ममताबादे ) : सणासुदीच्या दिवसात मिठाई पेढेच्या दुकानात भेसळयुक्त पदार्थांचा मोठया वापर सुरु झाल्याने ऐण सणासुदीच्या काळात भेसळयुक्त पदार्थचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.सणासुदीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात मिठाई पेढे यांसह दुग्धजन्य पदार्थांचे मोठ्या प्रमाणात विक्री होत असते व अशा पदार्थांना मागणी ही मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे असे पदार्थ विकताना सुरक्षिततेची काळजी व्यापाऱ्यांनी घ्यावी तसेच भेसळयुक्त पदार्थांची विक्री करू नये, असे आवाहन लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
ग्राहकांना भेसळयुक्त पदार्थ आढळून आल्यास त्याची त्वरित तक्रार प्रशासनाकडे करण्यात यावी.मिठाई विक्रेत्यांनी ताजी व चांगली मिठाई विक्रीस ठेवावी, असे आवाहनही लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रमेश म्हात्रे यांनी केले आहे.
सणासुदीच्या दिवसांमध्ये मिठाई पेढे व अन्य दुग्धजन्य पदार्थ यांची वाढती मागणी लक्षात घेता अनेकदा यामध्ये भेसळ करण्यात येते. दुधामध्ये पाणी, साखर, कॉस्मेटिक पदार्थ, डिटर्जंट्स, युरिया, सोडियम क्लोराईड, अमोनियम क्षार, सॅलिसिलिक ऍसिड, बोरिक ऍसिड, मेलामाइन, हायड्रोजन पेरोक्साइड, फॉर्मल्डिहाइड आणि इतर रासायनिक पदार्थ मिसळले जातात. हे पदार्थ आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असून यामुळे मळमळ, गॅस्ट्रोएन्टेरायटिस, यकृताचे आजार आणि मूत्रपिंडाचे आजार यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. तर मिठाईत कृत्रिम रंग (उदा. मेटॅनिल येलो), खवा, दूध, तांदळाचे पीठ , आणि ऍल्युमिनियम फॉइल मिसळले जाते, जे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. जास्त रंगीत, हाताला रंग लागणारी, किंवा चिकट पदार्थ असलेली मिठाई टाळावी. अशा भेसळयुक्त पदार्थांमुळे ग्राहकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होतो.त्यामुळे याबाबत लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था तर्फे जनजागृती अभियान राबविण्यात येत असून अशा प्रकारची कोणतीही भेसळ आढळल्यास त्याची त्वरित तक्रार करावी असे आवाहनही करण्यात आले आहे.
मिठाईतील, माव्यातील भेसळ,दुधातील भेसळ तसेच मिठाईतील अन्नपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचे अनेकदा विविध ठिकाणी आढळून येत आहे.त्यामुळे ग्राहकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.कोणाला भेसळ आढळून आल्यास लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या पदाधिकारी सदस्यांना संपर्क साधावे तसेच प्रशासनाकडेही संपर्क साधावे.मिठाई विक्रेत्यांनी ताजी व चांगली मिठाई विक्रीस ठेवावी असे आम्ही संस्थेच्या वतीने आवाहन करीत आहोत.
– रमेश म्हात्रे, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था.
उरण तालुक्यात १५० हुन जास्त बर्फी, पेढ्याचे, मिठाईचे दुकान आहेत. येथे मोठया प्रमाणात गोड पदार्थ, दुग्धजन्य पदार्थांची विक्री होते. त्यामुळे ग्राहकांनी कोणत्याही दुकानावर जाऊन योग्य निरीक्षण करून, पारख करूनच पदार्थ खरेदी करण्याची गरज निर्माण झाली आहे.