मच्छीमारीला पर्यटन व्यवसायाची जोड द्यावी : ना. नितेश राणे

सिंधुदुर्ग नगरी : पहिल्या १२० दिवसांत मच्छीमारांसाठी स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष, पूर्ण किनारपट्टीवर ड्रोन कॅमेरा आणि आता मत्स्य व्यवसायाला कृषी शेतीचा दर्जा एवढे निर्णय घेतले आहेत. यापुढे जिल्हा नियोजनाचा पाच टक्के निधी मत्स्य आणि मत्स्य विकास यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. मच्छीमारीला पर्यटन व्यवसायाची जोड देवून आर्थिक विकास साधावा, असे आवाहन राज्याचे मत्स्य व बंदर विकासमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील मच्छीमारांनी आयोजित केलेल्या सत्काराला उत्तर देताना केले आहे.
मत्स्य व्यवसायाला महायुती सरकारने कृषीचा दर्जा दिल्याने सिंधुदुर्गनगरी येथील सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात जिल्ह्यातील मच्छीमारांनी या खात्याचे मंत्री म्हणून नितेश राणे यांचा जाहीर सत्कार केला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिध दळवी, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे,
रविकिरण तोरसकर, छोटू सावजी, बाबा मोंडकर, दिलीप घारे, अशोक सावंत, दाजी सावजी, सेजल परब, विक्रांत नाईक, रुपेश प्रभू, ज्ञानेश्वर खवळे, अशोक सारंग, सन्मेष परब, रघुनाथ जुवाटकर, वसंत तांडेल आदी मच्छीमार प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना मंत्री राणे यांनी, आपण भक्कम महायुती सरकार निवडून दिल्याने असे क्रांतिकारी निर्णय घेणे शक्य झाले आहे. आठ वर्षातील विरोधी पक्षातील आमदार कालावधीत आलेले अनुभव, जाणवलेल्या समस्या सोडविण्याचा निर्णय या खात्याचा मंत्री झाल्यावर घेतल्या आहेत. तुमच्या हक्काचा माणूस मंत्रिमंडळात बसला आहे. इंडोनेशिया देशाचे ८४ टक्के अर्थकारण मासेमारीवर आहे. एवढी क्षमता या व्यवसायात आहे. त्यामुळे याची ताकद ओळखून महाराष्ट्रातील मच्छीमारांनी उन्नती साधावी, असे आवाहन केले. तसेच कृषीचा दर्जा मिळाल्याने यापुढे दुर्दैवाने नैसर्गिक आपत्ती आल्यावर शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष तरतूद करण्याची गरज नाही. आता याचा फायदा युवकांनी घ्यावा. आपल्या व्यवसायात उन्नती कशी आणता येईल, याचा विचार करावा. जिल्हा बँकेचा जास्तीत जास्त वापर मच्छीमारांनी करून घ्यावा. माझा सत्कार करण्यापेक्षा पुढील वर्षभरात महाराष्ट्रात मासेमारी कुठे आहे. कितव्या नंबरला गेली आहे. हे पाहिल्यावर समाधान वाटले पाहिजे. जिल्ह्यातील मच्छीमारांनी केलेल्या सत्कारा पेक्षा मोठा सत्कार दुसरा कुठलाच असू शकत नाही, असे सांगितले.
यावेळी बोलताना जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी महाराष्ट्राच्या इतिहासात हा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला आहे. आजच्या सत्काराला पूर्ण जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित आहेत. सर्व मच्छीमारांच्यात आज एकमत दिसत आहे. माहिती असलेल्या आमदाराला मत्स्य व्यवसाय खाते दिल्याने हा ऐतिहासिक निर्णय घेतला जावू शकला आहे. मच्छीमारांसाठी बांदा येथे निर्यात केंद्र उभारणार आहोत.
या केंद्राच्या नजिक मोपा विमानतळ, सावंतवाडी. रेल्वे स्टेशन नजिक आहे. त्यामुळे याचा फायदा होणार आहे. मच्छीमारानी पर्यटनाची जोड मिळणार आहे, असे सांगितले.
बाबा मोंडकर यांनी कृषी दर्जा मिळाल्याने मच्छीमार समाजाला संजीवनी आहे. मच्छीमार समाजाचा शाश्र्वत विकास साधला जाईल, असा विश्वास व्यक्त केला. अशोक सावंत यांनी गेली ३५ वर्षे पारंपरिक मच्छीमारांच्या बाजूने कायम राणे कुटुंबीय राहिला आहे, असे सांगितले. यावेळी अशोक सारंग, छोटू सावजी, दिलीप घारे, रविकिरण तोरसकर, सेजल परब, रघुनाथ जुवाटकर, ज्ञानेश्वर खवळे, विक्रांत नाईक, दादा केळुसकर, नितीन परुळेकर, बाळू वस्त यांनीही विचार व्यक्त केले.