मतदान केंद्रांमध्ये पायाभूत सुविधांवर भर द्यावा : जिल्हाधिकारी मनुज जिंदल

- नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025
- जिल्हास्तरीय संनियत्रण समितीची बैठक
रत्नागिरी, दि. ६ : जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी आज जिल्हास्तरीय संनियत्रण समितीची बैठक घेतली.
बैठकीला पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, प्रांताधिकारी जीवन देसाई, आकाश लिगाडे, मुख्याधिकारी वैभव गारवे, उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे, जिल्हा कोषागार अधिकारी प्रंविद बिरादार, तहसिलदार प्रियांका ढोळे, अमृता साबळे आदी उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी यावेळी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. मतदान केंद्रांमध्ये किमान पायाभूत सुविधा असल्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भर द्यावा. प्रिंटींग प्रेसमालकांना प्रकाशकाचे नाव, संख्या छपाईबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सूचना द्यावी. सर्व परवानग्या एकत्रितरित्या मिळण्यासाठी नगरपरिषद/नगरपंचायतमध्ये एक खिडकी राबवावी. तक्रार निवारण कक्ष स्थापन करावा. भरारी पथक निर्माण करुन तपासणी नाक्यांवर तैनात कराव्यात, अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांनी दिल्या.





