महाकुंभसाठी सावंतवाडी- प्रयागराज स्पेशल ट्रेन चालवावी
- अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीकडून रेल्वेकडे पत्रव्यवहार
रत्नागिरी : 144 वर्षातून येणारी पर्वणी पर्वणी म्हणजेच महाकुंभ मेळ्यासाठी कोकणातून सावंतवाडी येथून प्रयागराज साठी विशेष ट्रेन चालवण्याची मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने कोकण रेल्वेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यां रेल्वेच्या सर्व संबंधितांकडे यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी म्हटले आहे की, सध्या प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
१४४ वर्षांत एकदा साजरा होणारा हा महोत्सव लाखो भाविकांसाठी जीवनातील एक अद्वितीय आणि धार्मिक अनुभव ठरेल. त्यामुळे कोकणातील अनेक भक्त प्रयागराजला प्रवास करण्यासाठी इच्छुक आहेत.महा कुंभमेळ्यासाठी सावंतवाडी ते प्रयागराजदरम्यान काही विशेष गाड्यांची व्यवस्था करावी, कोकण रेल्वे मार्गावरील सर्व तालुक्यांतील नागरिकांना लाभ व्हावा, यासाठी या गाड्यांना सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा, पेण व पनवेल स्थानकांवर थांबे देऊन पुढे प्रयागराजला रवाना करावे, असे या निवेदनात म्हटले आहे.