महावितरणचे बड्या थकबाकीदारांना अभय तर सामान्य ग्राहकांची अडवणूक!

वसुलीसाठी सामान्य ग्राहकांना वीजपुरवठा खंडित करण्याच्या धमक्या
रत्नागिरी : स्मार्ट मीटर संदर्भात ग्राहकांमधील संभ्रम दूर करण्यात अपयश आलेल्या महावितरणने अलीकडे बिलांच्या वसुलीत बड्या थकबाकीदारांना मोकळे सोडून छोट्या ग्राहकांची अडवणूक करण्याचे धोरण स्वीकारलेय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
बिलांच्या थकबाकी वसुलीसाठी महावितरणकडून विविध मार्ग अवलंबले जातात. मात्र, यामध्ये प्रत्येक वेळी सामान्य ग्राहकच भरडताना पाहायला मिळतो. याआधी वीज ग्राहकांना त्यांच्या थकलेल्या कोणत्याही वीज बिलावरील क्यू.आर. कोड स्कॅन करून ते भरता येत असे. मात्र, आता त्यानंतरचे बिल जर लागू झाले असेल तर आधीच्या बीलावरील क्यू आर कोड स्कॅन करून बिल भरण्याची सुविधा महावितरणने बंद करून सामान्य ग्राहकांच्या अडचणीत आणखी वाढ केली आहे. असे केल्याने ग्राहकांना आलेले नवीन बिल की ज्याची मुदत शिल्लक आहे त्याच्यासकट बिल भरले तरच महावितरणची सिस्टीम ऑनलाइन बिल भरून घेत आहे.
मोठी रक्कम एडिट करून बिल भरण्याची सुविधाही काढली!
पूर्वी ऑनलाइन बिल भरताना जर रक्कम मोठी असेल आणि ग्राहकांना आणि एक रकमी भरता येत नसेल तर रक्कम सुधारून तसे बिल भरण्याची तरतूद होती. मात्र महावितरणने ही सुविधा देखील या आधीच काढून टाकली आहे. हे करताना ‘विलफुल डिफॉल्टर’ आणि काही अडचणीमुळे डिफॉल्टर राहिलेल्यांमध्ये महावितरण फरकच केला नसल्याचे पाहायला मिळते आहे.
राजकारणी, बड्या थकबाकीदारांवर कारवाई करताना हात आखडता
सर्वसामान्यांच्या बाबतीत बिलांच्या वसुलीबाबत त्याचप्रमाणे ऑनलाइन पेमेंट भरताना त्या सुविधेत महावितरण ग्राहकांना दिलासा देण्या ऐवजी त्यांच्यापुढे वेगवेगळ्या अडचणी निर्माण करीत आहे. ज्या सर्वसामान्य ग्राहकांची बिले थकली आहेत, अशांना कार्यालयात बसून वीज पुरवठा खंडित करण्याची धमकी देऊन बिले वसूल केली जात आहे. या उलट मोठमोठे व्यापारी, बडे राजकारणी यांच्या थकलेल्या लाखो रुपयांच्या वीज बिलासाठी कोणी वीज कर्मचारी फिरकतही नसल्याची उदाहरणे पाहायला मिळत आहेत.