महिलेच्या खून प्रकरणी ५५ वर्षीय प्रेमवीराला जन्मठेप

रत्नागिरी : ट्रान्सपोर्ट कंपनी ट्रकचालक म्हणून काम करणाऱ्या 55 वर्षीय आरोपीला 32 वर्षीय महिलेचा खून केल्याप्रकरणी येथील सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मारुती राजाराम मोहिते (55, हातकणंगले जिल्हा कोल्हापूर ) असे या घटनेतील शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
या खून खटल्यातील माहितीनुसार आरोपी मारुती मोहिते हा रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथे ट्रक चालक म्हणून काम करीत होता. तेथील गेस्ट हाऊसमध्ये साफसफाईच्या कामाला येणाऱ्या 32 वर्षीय महिलेशी मोहिते यांचे प्रेमसंबंध जुळले होते. ती तिच्या पतीशी फोनवर बोलते याचा राग मोहिते याला यायचा. यातूनच मोहिते यांने दिनांक 14 डिसेंबर 20 रोजी दुपारच्या सुमारास ही महिला व मारुती तेथील अतिथिगृहात एकत्र आले होते. त्यावेळी ती पतीशी फोनवर बोलत असल्याच्या रागातून मोहिते यांनी किचन ट्रॉलीचा लोखंडी रोड महिलेच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेला रुग्णालयात दाखल केले असता घटनेनंतर दोन दिवसांनी मृत घोषित करण्यात आले होते.
या प्रकरणी मोहिते याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती.
या खटल्यात न्यायालयाने मारुती मोहिते याला सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.