मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात भारताच्या हरित क्रांतीचे जनक भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांची जयंती साजरी

मांडकी-पालवण, 07 ऑगस्ट : कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी-पालवण संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय व जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 07 ऑगस्ट 2025 रोजी भारताच्या हरित क्रांतीचे जनक, महान कृषी शास्त्रज्ञ आणि भारतरत्न डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांची जयंती ‘शाश्वत शेती दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. स्वामीनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. स्वामीनाथन यांच्या कृषी क्षेत्रातील अतुलनीय योगदानाला आदरांजली वाहिली. प्राचार्य डॉ. संकेत कदम यांनी आपल्या भाषणात डॉ. स्वामीनाथन यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, “डॉ. स्वामीनाथन यांनी विकसित केलेल्या गहू आणि तांदळाच्या सुधारित जातींमुळे भारताला अन्नधान्याच्या बाबतीत आत्मनिर्भरता मिळाली. त्यांच्यामुळेच आज आपण हरित क्रांतीचा अनुभव घेऊ शकलो. त्यांचे कार्य केवळ कृषीपुरते मर्यादित नसून, त्यांनी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि देशाची अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठीही मोठे योगदान दिले आहे.”
यावेळी, कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक श्री. विघ्नेश सकपाळ यांनी ‘शाश्वत शेती’ या विषयावर विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि नैसर्गिक शेतीचे महत्त्व समजावून सांगितले. हवामानातील बदलांमुळे शेतीवर होणाऱ्या परिणामांवर मात करण्यासाठी शाश्वत शेती कशी फायदेशीर ठरू शकते, यावर त्यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम ,जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. बाळासाहेब सूर्यवंशी, डॉ.पांडुरंग मोहिते ,डॉ. सुनील दिवाळे तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.