मानसिक आजार होऊ नयेत यासाठी भावनांची सजगता महत्त्वाची : डॉ. वेलणकर
चिपळूणात ग्रंथाली प्रकाशन आयोजित विज्ञानधारा आरोग्ययात्रा
चिपळूण : ग्रंथाली प्रकाशनाने आयोजित केलेल्या महाराष्ट्रव्यापी विज्ञान धारा – आरोग्य यात्रेमध्ये मानसोपचार तज्ञ – समुपदेशक डॉ. यश वेलणकर, डॉ. संजय कलगुटगी आणि डॉ. श्रुतिका कोतकुंडे यांचे जीवनशैली व समस्या या विषयावर व्याख्यान रंगले. ग्रंथालीची ही यात्रा लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिर, इंडियन मेडिकल असोसिएशन, घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, वैष्णो व्हिजन, भावार्थ आणि दैनिक सागर यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळुणात आयोजित करण्यात आली आहे.
डॉ. यश वेलणकर यांनी मानसिक आजार होऊ नयेत यासाठी भावनांची सजगता किती आणि कशी महत्त्वाची आहे याबाबतचे विवेचन केले. मानसिक आजार म्हणजे काय? लोकांच्या मनात त्याबाबतचे कसे गैरसमज आहेत याबद्दलची मांडणी डॉक्टर संजय कलगुटगी आणि डॉक्टर श्रुतिका कोतकुंडे यांनी आपापल्या अनुभवाद्वारे केली. शरीराला जो आजार होतो तो माणसं मिरवतात मात्र मनाला होणारा आजार लपवून ठेवण्याकडे माणसाचा कल असतो असे प्रतिपादन डॉक्टरांनी केले. असे मानसिक आजार दडवून ठेवल्याने ते अधिक बळवतात आणि त्याचा त्रास जास्त होतो असे डॉक्टरांनी यावेळी सांगितले.
२६ नोव्हेंबर २०२३ रोजी या यात्रेचा अखेरचा दिवस असणार आहे. त्यानिमित्त लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर येथे आरोग्य विषयक परिसंवादाचा जाहीर कार्यक्रम सायंकाळी ५ ते ७ या वेळात आयोजित करण्यात आला आहे. या यात्रेत मुंबईहून आलेले डॉक्टर्स आणि यात्रेत सहभागी झालेले स्थानिक डॉक्टर्स आरोग्याच्या विविध विषयांवर चर्चा करणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन यात्रेचे संयोजक किरण क्षीरसागर यांनी केले.
विशेष म्हणजे ग्रंथालीची ही अनोखी यात्रा विविध आरोग्य तज्ञ, डॉक्टर आणि शास्त्रज्ञ यांना घेऊन महाराष्ट्रभर फिरणार आहे. तिचा प्रारंभ चिपळुणातुन झाला असून सांगता २४ डिसेंबर रोजी वाशी, नवी मुंबई येथे होणार आहे.