माळवाशीचे सुपुत्र सहायक पोलिस उपनिरीक्षक दिलीप कडू यांचा मुंबईत पोलिस आयुक्तांकडून गौरव

देवरूख : माळवाशी गावचे मूळ रहिवासी व मुंबईसह राज्याच्या पोलिस दलात 33 वर्षे उल्लेखनीय सेवा बजावलेले सहायक पोलिस उपनिरीक्षक दिलीप कडू यांचा मुंबई पोलिस दलातर्फे नुकताच सत्कार करण्यात आला. पोलिस दलात उत्कृष्ट सेवेबद्दल एकूण 86 बक्षिसे त्यांना प्राप्त झाली आहेत.
हा सत्कार समारंभ कार्यक्रम वरळी- मुंबई येथील नॅशनल स्पोर्ट संकुल डोममध्ये झाला. मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्या हस्ते दिलीप कडू व कुटुंबातील सदस्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या भाषणातून कडू यांच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले.
दिलीप कडू हे सन 1992 मध्ये मुंबई येथे राज्य राखीव पोलिस दलात कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले. सन 1992 ते 2003 पर्यंत राज्य राखीव पोलिस दल येथे कर्तव्यात असताना गडचिरोली जिल्हा नक्षल भागात तीन वेळा कर्तव्य बजावले. सन 2003 मध्ये राज्य राखीव पोलिस दलातून मुंबई पोलिस दलात आंतर जिल्हा बदली झाली. मुंबई पोलिस दलात 22 वर्षे सेवा बजावताना राईट कंट्रोल पोलिस, सशस्त्र दल, प्रोटेक्शन, पंतनगर, विक्रोळी पोलिस ठाणे व स्पेशल ब्रँच सीआयडी येथे सहायक पोलिस उपनिरीक्षक या विविध पदांवर त्यांनी उल्लेखनीय काम केले.
संगमेश्वर तालुक्यातील माळवाशी पंचक्रोशीत सामाजिक, क्रीडा, शिक्षण चळवळीत त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. पोलिस दलात सेवा करत असताना आपल्या मूळ गावाच्या विकासासाठी ते सातत्याने कार्यरत असतात. गावातील विविध धार्मिक कार्यक्रमात त्यांचा पुढाकार असतो. विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून ग्रामीण भागातल्या खेळाडूंना व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी विविध मंडळांची निर्मिती करण्यामध्ये त्यांचा पुढाकार आहे. त्या मंडळांच्या माध्यमातून अनेक क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम दरवर्षी आयोजित केले जातात. मुंबईतील चाकरमानी, विविध क्षेत्रात नामवंत असणारे गावातील नागरिक यांच्याशी समन्वय राखत याचा फायदा गावच्या विकासासाठी कसा होईल, गावातील एकता आणि एकात्मता टिकून राहण्यासाठी दिलीप कडू यांचे प्रयत्न सुरू असतात. गावच्या विकासातील एक महत्वाचा घटक, गावातील ग्रामस्थ आणि मुंबईतील चाकरमानी यांना जोडणारा एक दुवा म्हणून त्यांच्याकडे आजही पाहिले जाते.
माळवाशी परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणासाठी शहराकडे जावे लागत होते. अनेक विद्यार्थ्यांना खर्च व सोयीअभावी आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागत होते. त्यामुळे ग्रामीण भागात माध्यमिक शिक्षणासाठी हायस्कूल सुरू करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. सह्याद्री शिक्षण संस्थेने त्यांच्या या विचारांना मोलाची साथ देत माळवाशी गावात हायस्कूल उभारले. यामुळे पंचक्रोशीतील अनेक गोरगरिबांची मुले शिक्षण घेऊ लागली आहेत. कडू कुटुंबीयांच्या दातृत्वावर आज शिक्षणाचा वटवृक्ष बहरला आहे, याचे श्रेय दिलीप कडू यांनाच जात असल्याच्या प्रतिक्रिया गावातून उमटत आहेत. त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन माळवाशी पंचक्रोशीतूनही त्यांचे कौतुक होत आहे.