मिरकरवाडा बंदर राज्यातील सक्षम बंदर बनवणार : ना. नितेश राणे

रत्नागिरी : किनारपट्टी विकासातील आर्थिक समृद्धी हे महायुती सरकारचे ध्येय असून यासाठीच रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरातील अनेक वर्ष जुन्या अतिक्रमणाना हटवून आज येथे विविध विकासात्मक कामांचे भूमिपूजन करण्यात आले. ही कामे वेळेत पूर्ण होतील, असे सांगून येथील मच्छिमांच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार आणि मत्स्य विभाग कटिबद्ध असून भविष्यात येथे विविध विकासकामे करून मिरकरवाडा हे बंदर राज्यातील सक्षम बंदर बनविले जाईल, असा विश्वास राज्याचे बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिला.

मिरकरवाडा बंदराच्या टप्पा-२ अंतर्गत लिलाव गृह, जाळी विणकाम गृह, प्रशासकीय इमारत, संरक्षक भिंत, अस्तित्वात असलेल्या जेट्टीचे सक्षमिकरण, पाण्याची टाकी, प्रसाधनगृह, काँक्रिट जाण्या-येण्याकरीता रस्ते, उत्तरेकडील ब्रेकवॉटरचे टॉप काँक्रिट रक्कम अशी रु.२२.४३ कोटी इतक्या रकमेच्या कामांचा भूमीपूजन समारंभ रविवारी पार पडला.
या कार्यक्रमाला राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हेही उपस्थित होते. त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले.