मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातील एक लेन वाहतुकीसाठी सुरु
अवघ्या तीन मिनिटात पोलादपूरमधून खेड तालुक्यात येता येणार
खेड : गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांचा प्रवास यावेळी सुखकर होणार आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्यातून मुंबईहून कोकणात येण्यासाठी एका लेनवरून हलक्या वाहनांची वाहतूक सोमवार दि.११ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. हा निर्णय जरी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला असला तरी डिसेंबर पर्यंत बोगदा कायमस्वरूपी वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे संबंधित विभागांकडून सांगण्यात येत आहे.
मुंबई – गोवा महामार्गावरील अवघड असलेल्या कशेडी घाटाला पर्यायी असलेल्या बोगद्यातून सोमवारी दि.११ रोजी लहान वाहनांची एकदिशा वाहुतुक सुरू झाली आहे. खेड – दापोली – मंडणगड चे आ.योगेश कदम यांनी या बोगद्यातून आज प्रवास करून कोकणवासीयांसाठी राज्य व केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत केले व लवकरच दोन्ही बोगदे व मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम पूर्ण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
कशेडी बोगड्यामुळे प्रवासाचे अंतर सुमारे पाऊण तास कमी होणार असून अवघ्या तीन मिनिटात पोलादपूरमधून खेड मध्ये येता येत आहे. महत्वाचे म्हणजे मुंबई – गोवा महामार्गावर रहदारी आणि अपघाताचे प्रमाण देखील काही दिवस या निर्णयामुळे कमी होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या कशेडी बोगद्याच्या एका लेन मधून गणेशोस्तव पूर्वी वाहतूक सुरू झाल्याने गणेशभक्तांतून आनंद व्यक्त होत आहे.