मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळली ; चिपळूण, खेडला पुराच्या पाण्याचा वेढा
रत्नागिरी : हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार कालपासून कोसळत असलेल्या पावसामुळे खेडच्या जगबुडी नदीला पूर आल्याने जगबुडी नदीचे पाणी शहरात शिरू लागले आहे. चिपळूणमध्ये देखील वाशिष्ठी नदीला पुराच्या पाण्याने ग्रासल्याने शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. त्यामुळे तेथील नागरिक सध्या या दोन्ही ठिकाणचे नागरिक अलर्ट मोडवर आहेत.
जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती बघता प्रशासनाने चिपळूणमध्ये एन डी आर एफ ची तुकडी तैनात ठेवली आहे. अशातच खेडमधून वाहणाऱ्या जगबुडी नदीला पूर आल्यामुळे पुराचे पाणी शहरात शिरू लागले आहेत.
चिपळूण शहरातून वाहणारी वाशिष्ठी नदी देखील तुडुंब भरून वाहत आहे. या नदीचे पाणी बाजार पुलातला लागल्याने तेथे देखील पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
मुसळधार पाऊस सुरू असताना मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात परशुराम मंदिराकडील बाजूच्या लेनवर दरड कोसळली आहे. परशुराम घाटातून जाणारा हा महामार्ग चौपदरी बनवण्यात आल्याने पावसामुळे कोसळलेली दरड एका लेन वर आली आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक वाशिष्टी नदीच्या बाजूने असलेल्या मार्गिकेवरून खबरदारी घेऊन सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे.