मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे वाहतुकीसाठी धोकादायक
संगमेश्वर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी पिक अप शेड ते संगमेश्वर दरम्यान पडलेले भलेमोठे खड्डे वाहतुकीसाठी धोकादायक ठरू लागले आहेत. हे खड्डे बुजवून रस्ता वाहनांसाठी सुरक्षित न बनविल्यास होणाऱ्या परिणामांची पूर्णपणे जबाबदारी संबंधित विभागाने स्वीकारावी, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सचिन यादव यांनी दिला आहे.
या मार्गावरुन शाळा, कॉलेज, नोकरी तसेच दवाखान्यात जायचा तसेच सर्व शासकीय कार्यालयातील कामांसाठी सुध्दा याच मार्गाने जावे लागते आहे त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून संबंधित विभागाने वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.
पावसामुळे खड्ड्यांचा वाहनचालकांसह पादचाऱ्यांना अजिबात अंदाज येत नाही त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी धोक्याचा वनला आहे.
आता कुठे पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे अजून पूर्ण पावसाचा हंगाम बाकी आहे. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या कोणाचाही हकनाक बळी जाऊ नये अथवा अपघातामुळे कोणीही जायबंदी होऊ नये यासाठी या मार्गावर पडलेले भलेमोठे खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीसाठी योग्य करण्यासाठी संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी श्री. यादव यांनी केली आहे