मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजना महिलांपर्यंत पोहचविणे सर्वांची जबाबदारी : पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी, दि. १३ : महिलांना केंद्रबिंदू समजून शासन काम करत आहे. महिलांना सक्षम बनविण्यासाठी ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजना राबविण्यात येत आहे. महिलांपर्यंत शासनाच्या योजना पोहचविणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र वितरण करुन पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते देवरुख येथील मराठा भवन सभागृहात पालकमंत्री श्री. सामंत यांच्या देऊन देवरुख-संगमेश्वर तालुक्यात या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी आमदार शेखर निकम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, प्रांताधिकारी जीवन देसाई, विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे, तहसिलदार अमृता साबळे, गटविकास अधिकारी भरत चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, महिलांना सक्षम करण्याची शासनाची भूमिका आहे. महिला भगिनी घरातील आर्थिक नियोजन करत असताना त्या आर्थिक नियोजनामध्ये सरकारचा देखील सहभाग असावा, त्यासाठी देशातील पहिला ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. राज्यातील प्रत्येक महिलेला भाऊ म्हणून ताकद मिळावी, पाठबळ मिळायला पाहिजे, यासाठी हा निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी घेतला. महिलांपर्यंत शासनाच्या योजना पोहचविणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. संगमेश्वरमध्ये 38,716 पात्र लाभार्थी महिला आहेत. आतापर्यंत 19,148 महिला लाभार्थींनी नोंदणी केलेली आहे. संगमेश्वरमधील 38,716 महिलांना लाभ मिळण्यासाठी अधिकारी व पदाधिकारी काम करावे. संगमेश्वरमधील 100 टक्के महिलांना याचा लाभ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, महिलांनी इतर कुणाकडूनही अर्ज भरुन घेऊ नयेत. केवळ शासकीय यंत्रणेकडून अथवा स्वत: ऑनलाईन अर्ज भरावेत. महिलांना सक्षम करणारे शासन आहे. जिल्ह्यातील तीन लाख लाभार्थ्यांपर्यंत ही योजना पोहचवून त्यांना लाभ देणारा रत्नागिरी जिल्हा प्रथम क्रमांकाचा ठरेल. प्रशासनाने अहोरात्र मेहनत घेऊन शासनाच्या कल्याणकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचाव्यात, असेही पालकमंत्री म्हणाले. अर्ज भरण्यासाठी, योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी कोणीही पैसे मागत असेल, तर त्यांचा कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांना दिल्याचे ते म्हणाले, आपणही असा कोणीही पैसे मागत असेल तर तक्रार करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
पालकमंत्री म्हणाले, महिलांना केंद्रबिंदू समजून काम करणारे हे सरकार आहे. लेक लाडकी, वर्षातील 3 मोफत गॅस सिलेंडर, शुभमंगल योजना, एसटी सवलत, ज्येष्ठांसाठी वयोश्री योजना, तरुणांसाठी विविध योजना या सरकारकडून राबविल्या जात आहे. नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा.
आमदार शेखर निकम म्हणाले, शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत लाभ मिळावा, यासाठी काम करावे. तसेच शासनकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असेही श्री. निकम म्हणाले. मुख्यमंत्री माझी लाडकी सारखी चांगली योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राबविण्याचा निर्णय घेतला, त्याबद्दल शासनाचे प्रतिनिधी म्हणून पालकमंत्री उदय सामंत यांचे आभार त्यांनी व्यक्त केले.
मंजुरीपत्राचे लाभार्थी
पुष्पा पंदेरे, सरताज हुसैनीमयाँ, रंजना गोपाळ, जाकीया साटविलकर, अतिषा धने, गौरी जागुष्टे, ज्योत्स्ना कदम, शर्मिला जोशी, प्रज्वली देवळेकर, मनस्वी देवळेकर या लाभार्थी महिलांना आज प्रायोगिक मंजुरीची पत्रे देण्यात आली. तसेच लक्ष्मी चव्हाण, सावित्री झोरे, अंकीता सुदम, सुरेखा लांजेकर यांना शिधापत्रिकेचे वितरण करण्यात आले.
यावेळी वन विभागामार्फत बिबट्या हल्ल्यात जखमी झालेल्या साखरपा येथील समीर जाधव यांना 5 लाखांचा सानुग्राह अनुदान पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते देण्यात आला.000