महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयलोकल न्यूज

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरू राहील : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महिला सक्षम तर, देश सक्षम, महिलांचा विकास तर, देशाचा विकास

रत्नागिरी, दि. 21 : महिला सक्षम तर, देश सक्षम, महिलांचा विकास तर, देशाचा विकास, देशाला आर्थिक महासत्ता बनवायचे आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना कायमस्वरुपी सुरु राहील. भगिनिंना लखपती झालेले पहायचे आहे, असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

येथील चंपक मैदानावर झालेल्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कार्यक्रमाला महिला भगिनींकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, पालकमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर जेवढा आनंद झाला नाही, त्यापेक्षा जास्त आनंद आज तुमच्या चेहऱ्यावरील समाधान आणि आनंद पाहून झाला. रक्षाबंधनाचा सण एक दिवसाचा असला तरी, भावा-बहिणींमधील ऋणानुबंध कायमचे असतात. तुमचा हा भाऊ आयुष्यभार बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. ज्यांना अजून लाभ मिळाला नाही, त्यांच्याही खात्यात पैसे लवकरच जमा होतील. कुटुंब चालवताना बहिणींना कसरत करावी लागते. त्यांना मोठे कष्ट घ्यावे लागतात. त्यासाठीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आहे. कोणी माईचा लाल आला तरीही, योजना बंद पडणार नाही.

तुमचा भाऊ माहेरचा आहेर वाढवत जाणार आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, अनेक योजनांच्या माध्यमातून माझ्या बहिणींना लखपती होताना बघायचं आहे. ही लेना बँक नाही, ही देना बँक आहे. हे घेणारे सरकार नसून, हे देणारे सरकार आहे. जे करु शकतो तेच बोलणार आहे. या योजनेत सगळीच यंत्रणा कामाला लागली आहे. या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे, तुमच्या सावत्र भाऊंना जळजळ, मळमळ होऊ लागली आहे,
बदलापूर येथील घटना अतिशय दुर्दैवी आहे. आरोपींना फाशी झालीच पाहिजे. या महाराष्ट्रात मुलींच्या भावनेशी खेळणाऱ्या गुन्हेगारांची गय केली जाणार नाही. फास्टट्रॅकवर ही केस चालणार आहे. संस्था चालकांवरही कारवाई करण्याच्या सूचना आम्ही केल्या आहेत. चार वर्षाच्या मुलीच्या जीवाशी खेळू नका. हे सरकार त्या आरोपींना फाशी झाल्याशिवाय गप्प बसणार नाही. या चिमुरडीच्या जिवावर राजकारण करू नका. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. हात कलम करण्याचा, छाटून टाकण्याचा इतिहास आहे. बाळासाहेबांचा आणि आनंद दिघेंचा वारसा सांगणारा महाराष्ट्र आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सगळ्या जातीधर्माच्या बहिणींचा समावेश आहे. ही एक दिवसाची ओवाळणी नाही तर, कायमस्वरूपी माहेरचा आहेर आहे. यामध्ये वाढच होणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, सर्व भगिनिंना रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला ओवाळणी मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झालेल्या या योजनेला मोठा प्रतिसाद लाभला आहे. महिलांना आर्थिक सक्षम करण्यास सुरुवात झाली आहे. लाडकी बहीण सर्वत्र पोहचली आणि सर्वांना भावली. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनीही मेहनत घेऊन घराघरात जाऊन या योजनेचे अर्ज भरले. या योजनेचा त्यांनादेखील लाभ मिळाला आहे. याशिवाय अर्ज भरल्यानंतर 50 रुपयांचा लाभही मिळाला आहे. सिंधुरत्न योजनेमधून टुरिस्ट बस महिलांना देण्यात आल्या. ती चालविण्याची जबाबदारीही त्यांना दिली आहे. हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणारा राज्यातला पहिला जिल्हा आहे. पंधराशे रुपयांचा सन्मान निधी तुमच्या सक्षमीकरणासाठी आहे, असेही त्या म्हणाल्या.
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, ही योजना जाहीर झाल्यावर अनेकांनी टीका-टिपणी केली. शासन निर्णय झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होऊ नये म्हणून काही जणांनी, काही जणांना कोर्टात पाठविले. पण, कोर्टाने त्यांना फटकारले. महिला भगिणींच्या खात्यात आम्ही पैसे जमा करु शकलो, हा आनंद आम्हा सर्वांना आहे. महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांना सक्षम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कोणाचीही बिशाद नाही, ही योजना थाबविण्याची. हा निधी आपल्या आरोग्यासाठी वापरला पाहिजे. महिला भगिनिंना त्रास देणाऱ्या बँकांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही पालकमंत्र्यांनी दिला.
यावेळी रिमोटद्वारे सर्व जिल्हास्तरीय योजनांचे अनावरण मुख्यमंत्र्यांनी केले. मुख्यमंत्र्यांचे आभार मानणारे पत्र जिल्ह्यातील भगिनिंच्यावतीने पालकमंत्री श्री सामंत आणि महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महिला भगिनिंशी संवाद साधला. यावेळी अनेक महिलांनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button