युनायटेड गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी मध्यप्रदेशमध्ये जाऊन अनुभवले महाराष्ट्राच्या तीन कर्तृत्ववान माहेरवाशिणींचे कार्य!
चिपळूण : मातृभूमी परिचय शिबिर या गुरुकुलच्या उपक्रमाच्या निमित्ताने परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचालित युनायटेड इंग्लिश स्कूलची गुरुकुल विभागातील इयत्ता नववी व दहावीचे एकतीस विदयार्थी विद्यार्थिनी मध्यप्रदेश राज्यात या शिबिरासाठी गेली होती.
यावर्षी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे तीनशेवे जन्मशताब्दी वर्ष असल्याच्या औचित्याने मध्यप्रदेश राज्यामध्ये शिबिराचे नियोजन करण्यात आले होते.
उज्जैनमध्ये भौगोलिक दृष्ट्या महत्वाचे शैक्षणिक स्थळ जंतर-मंतर, सांदिपनी आश्रम व चौदा विद्या चौसष्ट कलांचे प्रदर्शन, महाकाल कॉरिडॉर महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन, तर इंदोरमध्ये खजराना गणपती मंदिर,कमला नेहरु प्राणी संग्रहालय, लालबाग पॅलेस,काच मंदिर आणि अहिल्याबाई होळकर यांचा राजवाडा व वस्तुसंग्रहालय अशी पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची ठिकाणे पाहून छप्पन दुकान मधून इंदोरी खाद्य संस्कृतीचा आस्वाद मुलांनी घेतला.
शिबिराच्या तिसऱ्या दिवशी युनायटेड प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी असलेल्या लोकसभेच्या माजी सभापती पद्मभूषण श्रीमती सुमित्राताई महाजन यांची स्नेहभेट घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. सुमित्राताईंच्या निवासस्थानी झालेली तास दीड तासाची स्नेहभेट मुलांसाठी अतिशय संस्मरणीय झाली पद्मभूषण पदक व नव्या जुन्या संसद भवनाचे फोटो अल्बम मुलांना तेथे प्रत्यक्ष पाहता आले.
शिबिराच्या चौथ्या दिवशी इंदोर मधून खांडवा च्या दिशेने जात असताना ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेत मुलांनी भव्य तीर्थक्षेत्र भेटीचा अनुभव घेतला आणि खरगोन, कसरावद अशा गावांमधून नर्मदा क्षेत्रातील निमाड अभ्युदय या संस्थेच्या माध्यमातून चाललेले सामाजिक काम समजून घेण्यासाठी नर्मदालयात पोहोचून आदरणीय भारतीताई ठाकूर यांनी निर्माण केलेल्या नर्मदालय म्हणजे Nimar Abhyudaya Rural Management And Development Association (N.A.R.M.A.D.A) या सामाजिक संस्थेचा परिचय दोन दिवसात करून घेतला.
कौशल्य प्रशिक्षण केंद्र कौशल्य प्रशिक्षण वाहन,दोनशे हून जास्त मुलांसाठीच असणार वसतिगृह, प्रकल्पग्रस्त आदिवासी मुलांसाठी निर्माण केलेल्या शाळा, गाई वासराने भरलेली गोशाळा , हे सगळं सांभाळणारी नर्मदालयातच शिकणारी मुलं असा विलक्षण अनुभव घेऊन मुलांनी तेलीभट्टीयाण च्या दिशेने प्रवास सुरू केला.
जवळपास चार-पाच किलोमीटर पायी चालून नर्मदा परिक्रमेचाही अनुभव घेत शंभर पेक्षा जास्त वय असलेल्या संत सियाराम बाबांचे दर्शन घेतले व परतीच्या प्रवासात रावेर खेड येथे अपराजित योद्धा बाजीराव पेशवा यांच्या समाधी स्थळाला भेट दिली. महेश्वर घाट महेश्वर किल्ला व तेथील अहिल्याबाईंचे विलक्षण काम दुपारचे सत्रात मुलांनी पाहिले.
भारतीताई ठाकूर यांच्या सहवासात नर्मदालयातील वसतिगृहात संपन्न झालेल्या शिबिर समारोप सत्रात गुरुकुलच्या मुलानी कोकण संस्कृती म्हणून जाखडी नृत्य व संगीत भजन सादरीकरण सर्व उपस्थितांसमोर केले व मनोगतांमधून शिबिराची अनुभव कथनेही केली. गुरुकुल विभागाकडून परशुराम एज्युकेशन सोसायटीची आठवण म्हणून भगवान परशुरामाची प्रतिकृती आणि कृतज्ञता पत्र भारतीताईना देण्यात आले.
शिबिराच्या सहा दिवसात मुलांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, आदरणीय सुमित्राताई महाजन आणि आदरणीय भारतीताई ठाकूर या महाराष्ट्रात जन्म होऊन मध्य प्रदेशात जाऊन उत्तुंग कर्तृत्व दर्शवलेल्या तीनही स्त्रियांचे विलक्षण अतुलनीय अफाट कार्य समजून घेतले त्याचबरोबर नर्मदेच्या आजूबाजूला प्रवास करताना समृद्धतेचा संपन्नतेचा अनुभव घेतला तेथील लोकांची आत्मीयता आपुलकी अनुभवली.
मातृभूमी प्रती ‘हिचे रुप चैतन्यशाली दिसावे जगाला कळावी हीची थोरवी’ असं म्हणत गुरुकुलात या शैक्षणिक वर्षाची झालेली सुरुवात मातृभूमी परिचय शिबिरातून ‘स्मरूनी तयांच्या कथा अन् व्यथाही, हिला न्यायचे रे पुन्हा वैभवी’ असं गात गात मध्यप्रदेश पाहताना
‘ भूमी ही महान धर्म धारिणी ‘ असं प्रत्यक्ष अनुभवून गुरुकुलातील दुसऱ्या शैक्षणिक सत्राची सुरुवात अत्यंत उर्जेने उत्साहाने होणारे हे निश्चित!