युरोपमधील सर्वात मोठ्या बंदराला महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या पथकाची भेट

मुंबई : युरोपमधील सर्वात मोठं बंदर आणि आशियाबाहेरील जगातील सर्वात मोठं बंदर असलेल्या नेदरलँडच्या रोटर डॅम बंदराला राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या पथकाने भेट दिली. या भेटीदरम्यान सीईओ बाउडेविन सायमन्स, बिझनेस हेड मार्क-सायमन बेनजामिन्स, आणि इतर प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या टीमचे स्वागत केले.

ही भेट महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या (MMB) पथकासाठी अत्यंत उपयुक्त ठरली. या भेटीत बंदरातील अत्याधुनिक ग्रीनफिल्ड शिप बोटी, प्रवासी नौका व त्यांची तांत्रिक क्षमता बारकाईने भेटीवर गेलेल्या पथकाने तपासली, तसेच संपूर्ण पायाभूत सुविधांचा आढावा घेतला.
युरोपमधल्या सर्वात मोठ्या रॉटरडॅम बंदराच्या क्षमता वृद्धी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचा विचार करत आहोत, ज्यामुळे महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड अधिक कार्यक्षम होईल.
नितेश राणे, मत्स्य व बंदरे विकास मंत्री महाराष्ट्र राज्य.
यावेळी एमएमबीचे सीईओ आयएएस पी. प्रदीप, रॉटरडॅमचे शिपिंग तज्ज्ञ श्री. रुट्गर वॅन डॅम, आणि सागरी विभागाचे संचालक श्री. हॅन बर्टले आणि रुलर एन्हान्सर्स चे व्यवस्थापकीय संचालक अंबर आयदे उपस्थित होते.
ही भेट सागरी क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि ज्ञानसंपन्नतेचा एक महत्वपूर्ण टप्पा ठरेल, असे या भेटीनंतर ना. नितेश राणे म्हणाले.